सोलापूर: अगोदरच तोट्यात असलेला सोलापूर जिल्हा दूध संघ अचानक वाढलेल्या दूध संकलनामुळे अधिक तोट्यात चालला आहे. २५ रुपयांनी खरेदी केलेले ४० हजार लिटर दूध २० रुपयांनी विक्री करावे लागत आहे. वारंवार पत्र देऊनही ‘महानंद’ दूध खरेदी करीत नसल्याचे सांगण्यात आले.
कोरोनाचा लॉकडाउन लागू होण्याअगोदर गाईचे दूध प्रति लिटर ३१ ते ३२ रुपयांनी खरेदी केले जात होते. कोरोनामुळे हॉटेल, स्वीट मार्ट बंद आहेत. शिवाय घरगुती दूध विक्रीवर परिणाम झाला आहे. यामुळे खासगी संस्थांनी दूध खरेदी दर प्रति लिटर अठरा व वीस रुपये केला व अधूनमधून सुट्टी घेणेही सुरू केले आहे. त्यामुळे शेतकºयांना अधिक तोटा सहन करावा लागत असून, सुट्टी घेतलेल्या दिवशी दुधाचे काय करायचे?, हा प्रश्न आहे.
खासगी संघांनी दूध खरेदी दर २० रुपयांवर आणला असला तरी सहकारी दूध उत्पादक संघाला शासन आदेशानुसार प्रति लिटर २५ रुपये दर देणे बंधनकारक आहे. सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संकलन कोरोनाच्या बंद अगोदर प्रति दिन ४० हजार लिटर होत होते. खासगी संघाची दराची स्पर्धा सुरू झाल्याने जिल्हा संघाची अडचण निर्माण झाली होती. मात्र कोरोनाच्या निमित्ताने खासगी संघांनी दर कमी केल्याने जिल्हा संघाचे संकलन प्रति दिन चाळीस हजारांहून ६० हजार लिटर इतके होऊ लागले आहे.
जिल्हा संघाचे पॅकिंगमधून दररोज वीस हजार लिटर दूध विक्री होते. उर्वरित शिल्लक ४० हजार लिटर दुधाचे काय करायचे? हा प्रश्न असताना शासनाने राज्यातील अतिरिक्त दहा लाख लिटर दूध दररोज खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. अगोदरच जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ आर्थिक अडचणीत आहे. त्यातच कोरोनामुळे प्रति दिन ४० हजार लिटर दूध २५ रुपयांनी खरेदी करून वीस रुपयांनी खासगी संघाला विक्री करावे लागत आहे. त्यामुळे संघाच्या तोट्यात अधिकच वाढ झाली आहे. शासन अतिरिक्त दहा लाख लिटर दूध सहकारी संघाकडून ‘महानंद’मार्फत खरेदी करणार आहे. तसा आदेश ३ एप्रिल रोजी काढला आहे. सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने ४० हजार लिटर खरेदी करण्यासाठी महानंदला दोन पत्रे दिली आहेत. दोन पत्रे दिली तरी ‘महानंद’ने अद्याप दूध खरेदी सुरू केली नाही.
दररोज दोन लाख रुपये तोटा - सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने शासन अंगीकृत ‘महानंद’ला दोन पत्रे देऊन तत्काळ आमचे ४० हजार लिटर दूध खरेदी करण्याची मागणी केली आहे. सध्या होणाºया संकलनापैकी ४० हजार लिटर दूध शिल्लक राहत असून या दूधाचे करायचे काय?, असा प्रश्न आमच्यासमोर असल्याचे जिल्हा दूध संघाच्या पत्रात म्हटले आहे. प्रति लिटर २५ रुपयांनी शेतकºयांकडून खरेदी केलेले दूध २० रुपयांनी विक्री करावे लागत असल्याने संघाला दररोज दोन लाख रुपये इतका तोटा सहन करावा लागतो आहे.