सोलापूर : सहकार, शिक्षण क्षेत्रातील कामाने समाजकारणात आणि जनतेत आदराचे स्थान मिळविलेल्या ज्येष्ठ नेते माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनामुळे मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाहिली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी, माजी आमदार आणि एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांचं सोमवारी रात्री निधन झालं. ते ८६ वषार्चे होते. त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यावर ते पुण्यात एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, सोलापूर जिल्ह्याच्या समाजकारणात माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना आदराचे स्थान होते. त्यांनी पंढरपूर मतदार संघाचे विधानसभेत दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले. सहकारी साखर कारखाना, बँक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कामाने त्यांनी सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे सहकार, समाजकारणातील मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे. माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना विनम्र श्रद्धांजली असेही त्यांनी म्हटले आहे.