सोलापूर : काही दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झालेली एक व्यक्ती दयानंद महाविद्यालय परिसरात दिसली. काही तरी बडबड करत येथील एका भिंतीच्या आडोशाला बसून राहिलेले मोहन नारायण गादम महापालिका कर्मचारी जनार्दन पांडुरंग मोरे यांच्या नजरेस पडले. त्यांनी त्यांची विचारपूस केल्यानंतर ते नीलम नगर येथील रहिवासी असल्याचे कळाले. त्यानंतर त्यांनी या व्यक्तीचा फोटो आणि तपशील सोशल मीडियावर पोस्ट केला.
व्हॉट्सअॅपवर तसेच फेसबुकवर मेसेज पडल्यानंतर अवघ्या काही मिनिटात मोहन गादम हे त्यांच्या घरी सुखरुप पोहोचले. एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर गादम यांच्या नातेवाईकांनी त्यांचा फोटो आणि मेसेज पाहिला. त्यानंतर लगेच त्यांचे नातेवाईक दयानंद महाविद्यालयाच्या परिसरात पोहोचले आणि एका वाहनामधून त्यांना तेथून त्यांच्या घरी नेण्यात आले. घरी पोहोचल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी व्हॉट्सअॅप प्रेमींचे आभार मानले.
अधिक माहिती देताना महानगरपालिकेच्या मुस्लीम कब्रस्तान येथील मयत नोंदणी कर्मचारी जनार्दन मोरे यांनी सांगितले, शुक्रवारी २४ जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजता मी नेहमीप्रमाणे अक्कलकोट रोड येथील मुस्लीम कब्रस्तानकडे जात होतो. सकाळी दयानंद कॉलेज परिसरात एका आडोशाला मोहन गादम मला दिसले. ते एका वेगळ्या अवस्थेत होते. त्यापूर्वी दोन ते तीन दिवस मी त्यांना पाहत होतो. शुक्रवारी सकाळी मी थांबून त्यांच्याशी बोललो. संवाद साधला. घरची अधिक माहिती विचारली. तर ते नीलम नगर येथील रहिवासी असल्याचे सांगत होते. ही माहिती आणि त्यांचा फोटो मी माझ्या फेसबुकवर टाकला.
मेसेज व्हायरल...जनार्दन मोरे म्हणाले, माझ्या फेसबुकवरची व्हायरल पोस्ट वाचून माझे मित्र भास्कर आडकी यांनी ती माहिती आणि फोटो त्यांच्या समाजाच्या एका ग्रुपवर त्यांनी टाकली. त्यानंतर त्या समाजाच्या ग्रुपवर गादम यांचे नातेवाईक होते. त्यांनी तत्काळ त्यांना ओळखले. हे आमचे नातेवाईक आहेत. त्यांना आम्ही घेऊन जाऊ इच्छित आहोत. त्यांचा पत्ता सांगा, अशी विचारणा केली. त्यानंतर त्यांचे नातेवाईक त्यांना घेऊन गेले.