सोलापूर : विद्युत रोषणाई अन् पुष्पमालांनी सजलेले पंचतारांकित हॉटेल बालाजी सरोवर... लग्नघटिका समीप आल्याने भारावलेले वातावरण... तमाम सोलापूरकरांमध्ये एकच उत्सुकता... प्रत्येकाच्या चेहर्यावर ओसंडून वाहणारा आनंद...निमित्त होते लोकमतच्या ‘चला लग्नाला’ या अनोख्या पाच अंध दाम्पत्यांच्या विवाह सोहळ्याचे. अंधांच्या जीवनामध्ये सोनेरी पहाट घेऊन येणार्या या शाही विवाह सोहळ्याला तब्बल अडीच हजारांहून अधिक सोलापूरकरांनी उपस्थिती दर्शवून ‘याचि देही याचि डोळा’ हा भावोत्कट सोहळा मनात साठवला आणि नवपरिणितांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ‘चला लग्नाला’ या लोकमतच्या पथदर्शी उपक्रमांतर्गत पाच अंध दाम्पत्यांचा शाही विवाह सोहळा तमाम सोलापूरकरांच्या दृष्टीने औत्सुक्याचा विषय ठरला होता. दिवसभर शहराच्या चौकाचौकात या शाही विवाह सोहळ्याची चर्चा होती. आपणही या आगळ्यावेगळ्या सोहळ्याचे साक्षीदार ठरावे या भावनेने प्रत्येकाची पावले आपसूकच विवाह स्थळ असलेल्या हॉटेल बालाजी सरोवरकडे वळत होती. जो तो जणू आपल्याच घरचे कार्य आहे अशा भावनेने अगदी हळदीच्या कार्यक्रमापासून ते लोकमत भवन येथून विवाह स्थळाकडे निघालेल्या वरातीच्या यशस्वीतेसाठी झटत होता. आसरा चौकात शाही वरात पाहण्यासाठी सोलापूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सजविण्यात आलेल्या दोन बग्गीमध्ये पाचही दाम्पत्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. पावणेसात वाजता वाजतगाजत वरात विवाहस्थळी पोहचली. बालाजी सरोवरच्या प्रवेशद्वारासमोरच लोकमतचे संपादक राजा माने, सहा. सरव्यवस्थापक रमेश तावडे वºहाडी मंडळींचे अगत्याने आदरातिथ्य करीत होते. ज्या क्षणाची तमाम सोलापूरकर आणि वºहाडी मंडळी वाट पाहत होती तो क्षण आला. सबंध सभागृह वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी तुडुंब भरले होते. यजमान असलेले रोटरी क्लब आॅफ नॉर्थचे अध्यक्ष शिवाजी उपरे, सचिव संतोष भंडारी, नॅबच्या सोलापूर शाखेचे संस्थापक प्रकाश यलगुलवार, सचिव शशीभूषण यलगुलवार ही मंडळी काय हवं, नको ते पाहण्यात मग्न होते. मंत्रोपचाराने अक्षता सोहळा सुरु झाला आणि प्रत्येकाच्या चेहर्यावरील एक अनोखी समाधानाची लकेर स्पष्ट दिसत होती. या आगळ्यावेगळ्या सोहळ्यासाठी अडीच हजारांहून अधिक सोलापूरकरांनी उपस्थिती दर्शवून हा क्षण मनोमन साठवून ठेवला. या शाही विवाह सोहळ्याचे पौरोहित्य विवेक कुलकर्णी, अण्णा कामतीकर आणि योगेंद्र करजगीकर यांनी केले. या अनोख्या सोहळ्याचे धावते वर्णन मुख्य उपसंपादक शंकर जाधव यांनी केले
. -----------------
यांनी केले कन्यादान
सबंध सोलापूरकरांच्या औत्सुक्याचा विषय ठरलेल्या या अभिनव विवाह सोहळ्यात पालकमंत्री दिलीप सोपल, आमदार दिलीप माने, ह.भ.प. जयवंत बोधले महाराज, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, बालाजी सरोवरचे संचालक राम रेड्डी यांच्या हस्ते कन्यादान करण्यात आले.
पोलीस बँडने केले स्वागत
वरात बालाजी सरोवरमध्ये पोहोचल्यावर पोलीस बॅन्ड पथकातर्फे वºहाडींचे स्वागत करण्यात आले. सामाजिक बांधिलकीतून लोकमतने राबविलेल्या या आगळ्या उपक्रमासाठी पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांनी विशेष बाब म्हणून पोलीस बॅन्ड उपलब्ध केला.
----------------------------
हे ठरले आकर्षण
तिरुपतीचा लाडू, एसएमटीची सेवा, प्रतिज स्पॉलोनमध्ये हेअर स्टायलिश व अॅस्थेटिशियन प्रतिभा पावस्कर-पवार यांच्यातर्फे वधूंना मेकअप, लोकमत कार्यालयापासून सवाद्य वरात, एम. ए. पटेल यांची आतषबाजी, पोलीस बॅन्ड पथकाची धून, मान्यवरांच्या हस्ते कन्यादान हे सर्वांच्या सक्रिय योगदानातून पार पडलेल्या शाही विवाह सोहळ्याचे आकर्षण ठरले
. --------------------
यांचा जुळला ऋणानुबंध
निर्मला अशोक जाधव (पेवा, हादगाव, नांदेड) - गजेंद्र भागवत गुटाळ (गुरसाळे, पंढरपूर)
सुशीला काशीराम व्हलगिरे (फुलवाडी, यवतमाळ)- अरुण संजूलाल सावलकर (खिडकी कलम, सावलीखेडा, अमरावती) वनिता महादेव भेलेकर (कन्हेरवाडी, उस्मानाबाद)- विकास सुखदेव पवार (कोपर्डी, अहमदनगर)- शिवकन्या प्रल्हाद बोराळे (देवणी हिप्परगा, लातृूर)- दिनेश नंदूलाल जटाले (कुंडलिकनगर, बुलढाणा)
वनिता बंडू शिंदे (अंजनखेड, यवतमाळ)- संतोष बबनराव अडगळे (बावी, उस्मानाबाद)
------------------------------------
सूर्य मावळतीकडे निघाला...एरवी उदास वाटणारा संधीकाळ या अनोख्या विवाह सोहळ्यामुळे नवचैतन्याची बरसात करीत होता. चार वाजण्याच्या सुमारास ‘एसएमटी’ सीटीबसमधून पाचही अंध दाम्पत्य आणि वºहाडी मंडळी ‘लोकमत भवन’मध्ये दाखल झाली....अन् आनंदाला उधाण आले.... अन् शाही वरात निघाली. नाशिक ढोलच्या रांगड्या तालावर तरूणाई थिरकत होती; त्यामुळे आनंद द्विगुणित होत होता.