माळशिरस : राम राम पाव्हणं घ्या की चहा... हाप हाप घेऊ... चहाला नाही म्हणायचं नाही... चहा प्या नाहीतर बिल भरा... मग या गोष्टीवर होऊन जाऊ द्या चहा.. अशा ठरलेल्या संवादानंतर चहाच्या टपऱ्या गजबजून जायच्या. चहा तयार होऊन पिण्याच्या कालावधीत राजकारण, समाजकारण यासह देश वा जागतिक पातळीवरील, तर कधी सुख-दुःख व अनुभवाच्या दिलखुलास गाप्पांबरोबरच्या अर्धा कप चहा पीत तासनतास बसणारे चोखंदळ चहा शौकीन अलीकडे प्रोफेशनल चहा स्टॉलकडे आकर्षित होताना दिसत आहे.
संवाद प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा धागा ठरतो; मात्र याच संवादासाठी पाहुणचाराचा महत्त्वाचा दुवा म्हणजे चहा ठरतो. समाजातील गरीब घटकांपासून श्रीमंत घटकांपर्यंत चहा हे कॉमन पेय म्हणून प्रचलित आहे. या चहामुळे अनेकांच्या ओळखीपाळखी होतात. महामार्गावर असणाऱ्या चहा स्टॉलवर वर्षानुवर्ष अनेक वाहने हक्काने थांबतात. चहावाला व प्रवाशांनामधील एक वेगळे नाते अनेक ठिकाणी पाहायला मिळते. अलीकडील काळात आपापल्या नावाचे ब्रँड तयार करून विशिष्ट प्रकारे चहा विक्री करणारे चहा पॉइंट पुढे आले आहेत. यामुळे हे चहा शैकीन अशा स्टॉलकडे आकर्षित होऊ लागले आहेत.
चहातला गोडवा
पाहुणचारासाठी चहाचा फंडा प्रसिद्ध असला तरी चाय पे चर्चा नेहमीच सुरू असते. वेगवेगळ्या ग्रुपमध्ये शासकीय कार्यालयापासून सर्वसामान्य नागरिकांमध्ये चहाचे बिल कोण भरणार यावरून लुटुपुटीचे तंटे सुरू असतात. अनेक कामाच्या वस्तू खरेदीचा निमित्ताने यावर चहा झाला पाहिजे असा हट्टही धरला जातो. चहा पिण्याच्या व पाजण्याच्या या खेळामध्ये मैत्रीचे नाते घट्ट होते. त्यामुळे जीवनातील अनेक नात्यांमध्ये चहा गोडवा आणतो.
---चहाचे वैविध्य प्रकार
माणसाची जीवनशैली बदलली जात आहे. त्यामुळे चहा मिळण्याची ठिकाणे सध्या स्टॅंडर्ड पद्धतीने सजवली जात आहेत. यात चहा, कॉफी, ब्लॅक टी, गुळाचा चहा असे अनेक चहाचे प्रकार सध्या पुढे येत आहेत. त्यामुळे साहजिकच चहा शौकीन अशा स्टॉलकडे आकृष्ट होताना दिसत असल्याचे हॉटेलमालक दादासाहेब हुलगे यांनी सांगितले.
दादासाहेब हुलगे, हॉटेल मालक
फोटो