सोलापूर : बाळं दत्तक दिली जातात, हे आपणाला ठाऊक आहे; पण श्वानही कुणाला दत्तक स्वरूपात कुणाला पाळायला देतात, हे थोडं हटकेच... होय, दोन तरूण सोलापूरकर हे काम मोठ्या आवडीनं अन् मायेनं करत आहेत. ते जणू आवाहनच करतात... कुणी मोती घ्या, कुणी राजा अथवा कुणी वाघ्या घ्या.
अनेकांना श्वान पाळण्याची हौस असते. बहुतांश ठिकाणी देशीपेक्षा विदेशी श्वानच पाळले जातात. त्यामुळे देशी श्वान हे सहसा रस्त्यावर फिरताना दिसून येतात. या बेवारसपणे फिरणाऱ्या श्वानांना हक्काचे घर देण्यासाठी दोन तरुण काम करत आहेत. अंकुर येळ्ळीकर हे पुण्यातील एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करतात. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून ते सोलापुरातून काम करत आहेत. या दरम्यान त्यांना बेवारस श्वानांच्या समस्येबाबत काम करावेसे वाटले. आधीपासूनच श्वानांची आवड असल्याने त्यांना बेवारस श्वानांना दत्तक देण्याची कल्पना सुचली. यासाठी ॲड. स्वप्नाली चालुक्य - गोयल या त्यांच्यासोबत काम करत आहेत. श्वानांना जखम झाल्यास राहत ॲनिमल संस्थेच्या मदतीने औषधोपचारही केले जातात.
विदेशी श्वान हे दिसायला आकर्षक असतात. त्यातील अनेक श्वान हे चपळ नसल्यामुळे त्यांचा संरक्षणासाठी जास्त फायदा होत नाही. त्यामुळे देशी श्वानांच्या गुणाबाबत जागृती करुन अशा रस्त्यावर फिरणाऱ्या श्वानांसाठी हक्काचा निवारा देण्याचा या तरुणांचा प्रयत्न आहे.
-------
देशी श्वान पडतात कमी आजारी
विदेशी श्वान हे इथल्या वातावरणातील नसल्यामुळे ते आजारी पडतात. तर देशी श्वान हे स्थानिक वातावरणात अधिक चांगले राहू शकतात. देशी श्वानांना चपाती, भाकरीसारखे माणसाचे अन्न चालते. तर विदेशी श्वानांना डॉग फूडच द्यावे लागते. एकूणच देशी श्वानांना सांभाळणे तुलनेने सोपे असते.
-------
आत्तापर्यंत ५० देशी श्वानांना दिले दत्तक
सोशल मीडियाचा वापर करुन रस्त्यावरील देशी श्वानांचे फोटो शेअर करण्यात येतात. ज्यांना श्वान हवे आहेत ते संपर्क साधतात. श्वानांना खाऊ घालून सोबत नेण्यात येते. देशी श्वानांची मागणी ही शेत सांभाळण्यासाठीच केली जात असल्याचा अनुभव असल्याचे अंकुर येळ्ळीकर यांनी सांगितले. पण, घरामध्येही अनेक श्वान दत्तक देण्यात आले आहेत.
--------
देशी श्वान हे अनेक संकटांचा सामना करत जगत असतात. त्यामुळे एकतर ते भित्रे तर होतात नाहीतर भुंकणारे किंवा चावा घेणारे होतात. त्यांना थोडी जरी माया लावली तर ते मरेपर्यंत आपल्यांना विसरत नाहीत. विदेशी श्वानांपेक्षा देशी श्वान हे जास्त चपळ असतात. यामुळेच देशी श्वान पाळायला नागरिकांनी अधिक प्राधान्य द्यायला हवे.
- अंकुर येळ्ळीकर, श्वानप्रेमी