सोलापूर : प्रेयसीसोबत काढलेले अलिंगनाचे फोटो स्टेटसवर ठेवणाऱ्या प्रियकराच्या गळ्यात बुटांची माळ घालून रस्त्यावरून धिंड काढण्यात आली. यात एका तरुणीनेही पुढाकार घेत तरुणाला मारहाण केल्याचे दिसत असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.. दरम्यान, त्या प्रियकराच्या आईने वरील आरोपींवर ॲट्रॉसिटी व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार दिली आहे.
सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वीपासून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील तरुण हा शहरातील एका मध्यवर्ती भागात असणाऱ्या चाळीत राहत होता. तिथेच असणाऱ्या एका मुलीसोबत त्याची मैत्री झाली. मुलगा हा सोळा वर्षाचा तर मुलगी अठरा वर्षाची होती. या अल्लड वयात दोघेही एकमेकांच्या जवळ आले. त्यादरम्यान दोघांनीही आलिंगन देत फोटो काढले. इतकंच काय तर दोघांनीही एकमेकांसोबत जगण्या-मरण्याची शपथ घेतली. दरम्यान, त्या मुलीचे लग्न नात्यातील एका मुलासोबत ठरले. त्यामुळे हे लग्न मोडावे, यासाठी त्या तरुणाने तिच्या सोबतचे फोटो आपल्या मोबाइल स्टेटसवर ठेवले. हे फोटो व्हायरल होत मुलीच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचले.
यामुळे संतापलेल्या कुटुंबीयांनी त्या मुलाचा शोध घेतला. मुलाच्या वाढदिवसादिवशी तुला पार्टी देतो, असे सांगत बोलावले. त्यानंतर पाच ते सहा जणांनी मिळून त्या तरुणाला मारहाण करत रस्त्यावरून धिंड काढली. दरम्यान, घराजवळ आल्यानंतर एका तरुणीनेही त्याला मारहाण केली. नंतर त्या तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला.
मुलाच्या आईची पोलिसांकडे धाव दरम्यान, मुलाच्या आईने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देत, ती सज्ञान मुलगी आपल्या मुलासोबत फोनवर बोलत होती. रात्री-अपरात्री आपल्या अल्पवयीन मुलाला स्वतःजवळ बोलून घेत त्याचे लैंगिक शोषण केले. गळ्यात पादत्राणांची माळ घालत त्याची धिंड काढली व त्याची चित्रफित समाज माध्यमावर प्रसारित केली. यामुळे त्या सर्वांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत व बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.
आण रे बांबू !त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्या तरुणाला दोन जणांनी पकडून रस्त्यावरून मारहाण करत शिवीगाळ करत घेऊन जात आहेत. रस्त्यावरून जात असताना जे साहित्य हातात मिळत आहे, त्या साहित्याने त्या तरुणाला मारहाण करत असल्याचे चित्र ही व्हिडिओत दिसत आहे. यात काही तरुण आण रे तो बांबू, असे म्हणत शिवीगाळ करतानाचा आवाज येत आहे.