अमर गायकवाड
माढा : माढा तालुक्यातील तडवळे म येथील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीमध्ये दोन जागेसाठी अतिशय चुरशीने मतदान झाले़ गावातील दोन्ही वार्डात असलेल्या प्रभागातील उमेदवारांना समसमान मते पडल्याने ईश्वरी चिठ्ठीवर उमेदवारांचे भवितव्य ठरले़ यात आजी व नातू विजयी झाले़ यामध्ये प्रभाग क्रमांक एक़मधून दिनेश मोहन गिरी हे विजयी झाले आहे.
इयत्ता तिसरीमधील विद्यार्थी हर्षवर्धन संदीप काशीद याने ईश्वरी चिट्ठी काढली. तर वार्ड क्रमांक दोनमधून राजाबाई नामदेव गिरी विजयी झाल्या. किर्तिराज धैर्यशील भांगे इयत्ता चौथीमधील विद्यार्थ्याने ईश्वर चिठ्ठी काढली. चुरशीने झालेल्या मतदानात प्रभाग क्रमांक १ मधील दिनेश मोहन गिरी व सतीश दिलीप कुमार गोसावी यांना प्रत्येकी २१९ मते मिळाले आहेत.
वार्ड क्रमांक दोन मधील राजाबाई नामदेव गिरी व शिवकन्या धनाजी गिरी यांना प्रत्येकी १४८ मध्ये मिळाली़ बालाजी सुतार व आम्रपाली बालाजी सुतार या पती-पत्नीने ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने ओबीसी प्रवर्गाच्या या दोन रिक्त जागेवर निवडणूक लागली होती. राष्ट्रवादी पुरस्कृत परबत गटाच्या पाच जागा होत्या व काका पाटील गटाच्या दोन जागा होत्या.
सुतार दांम्पत्याने दिलेल्या राजीनाम्यामुळे दोन जागा रिक्त झाल्याने मागीलवेळी वेगवेगळे लढलेल्या शिवसेना व पाटील गट यांनी एकत्र येत परबत गटाला शह देण्याचा प्रयत्न केला मात्र दोन्ही बाजूने समसमान मते पडल्याने ईश्वर चिट्टीचा फायदा परबत गटाला मिळाल्याने पुन्हा परबत गटाची सत्ता कायम राहणार आहे.
सध्या परबत गटाचे सरपंच धनाजी परबत, विश्वनाथ परबत, बाळासाहेब परबत यांनी सत्ता कायम ठेवली आहे. तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी विजय लोकरे व विजयकुमार जाधव यांनी काम पाहिले़