सोलापूर : जिल्ह्यात मांडवे (ता. माळशिरस) आणि नंदूर (ता.उत्तर सोलापूर) या दोन ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गाय आणि म्हैशींना लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. एन.ए. सोनवणे यांनी दिली.
जिल्ह्यात लंपी आजार माळशिरस तालुक्यातील शिंगोर्णी गावात एका म्हैशीला आणि नऊ गायींना आला होता. त्या जनावरांवर उपचार केल्याने आजार आटोक्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात लंपीचे एकही जनावरे नाहीत. जिल्ह्यासाठी पुणे येथून 21 हजार लस मिळाल्या तर माळशिरस येथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी 5500 लस खरेदी केली आहे. अशा एकूण 26 हजार 500 लसी मिळाल्या असून आणखी लस लवकरच उपलब्ध होणार आहे. आज मांडवे गावापासून पाच किलोमीटर परिसरातील सर्व गाय आणि म्हैशींना लसीकरण करण्यात येत आहे. शिवाय उत्तर तालुक्यातील नंदूर गावातही याचपद्धतीने लसीकरण सुरू आहे. उर्वरित जिल्ह्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरण करण्याचे नियोजन आहे.
लसीकरण हे प्राधान्याने बाधित क्षेत्र, मोठ्या गोशाळा, मोठ्या प्रमाणात जनावरे असणारे डेअरी फार्म, गोठ्यांमध्ये, जास्त संख्येने जनावरे असलेल्या ठिकाणी लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. सोनवणे यांनी दिली.
नागरिक, पशुपालकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. गाय, म्हैस आणि त्यांची वासरू/रेडकू यांनाच लंपी हा आजार होतो. इतर प्राणी, पक्ष्यांना हा आजार होत नाही. यामुळे पशुपालकांनी घाबरून जाऊ नये. जनावरांच्या अंगावर मोठे पुरळ उठल्यास त्या जनावराला इतर जनावरांपासून दूर विलगीकरणात ठेवा. अशा जनावरांवर शासकीय दवाखान्यात उपचार करावेत, असे आवाहनही डॉ. सोनवणे यांनी केले.