सोलापूर : ग्रामीण भागातील जनावरांमध्ये असलेला लम्पी आजार आता शहरातील जनावरांमध्ये पसरत आहे. शहरात 10 जनावरांवर उपचार सुरु असून सहा जनावरांचा मृत्यू झाला आहे. आजारावर प्रतिबंध आणण्यासाठी महापालिका आणि पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय यांच्याकडून लसीकरण करण्यात येत आहे.
विजापूर रोड, पुणे रोड, दहिटणे, मुळेगाव, सत्तर फूट रोड यासह शहरातील इतर भागात लम्पी बाधित जनावरे आढळत आहेत. या परिसरातील जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. महापालिकेचे कर्मचारी हे शहरात फिरणाऱ्या भटक्या जनावरांना पकडून कोंडवाड्यात आणत आहेत. या जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे.
शहरात फिरणारे जनावरांना पकडून १५० जनावरांचे लसीकरण केले आहे. जनावरांच्या जनगणनेप्रमाणे शहरात गायवर्गीय १३०० जनावरे आहेत. यासोबतच गोशाळा व खासगी मालकीचे जनावरेही आहेत. शहरात आत्तापर्यंत ३६ जनावरांना लम्पी झाला होता. त्यापैकी ३० जनावरे बरे झाले आहेत. तर सहा जनावरांचा मृत्यू झाला आहे. १० जनावरांवर उपचार सुरु आहे.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी करा संपर्कशहरात लम्पीबाधित जनावर आढळल्याल त्याची माहिती दिल्यास त्वरित उपचार होऊन आजाराला प्रतिबंध घालता येऊ शकतो. गोचीड, गोमाश्यास, डास होऊ नयेत याची काळजी घेणे गरजेचे आहे. कोणाची जनावरे लसीकरण करण्याची राहिली असल्यास त्यांनी तात्काळ लसीकरण करून घ्यावे असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. भास्कर पराडे यांनी केले आहे.