मोहोळ : भरधाव वेगाने निघालेल्या लक्झरी बसने मालट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने अपघात होऊन बसमधील दोघेजण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. हा अपघात शुक्रवारी पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळ शहराच्या शिवारात घडला.
अनिता चंद्रकांत पवार (वय ३२, रा. नेहरुनगर तांडा, ता. आळंद, जि. गुलबर्गा), तारानाथ बसवराज पवार (वय २८, रा. लखनापूर तांडा, ता. जेऊरगी, जि. गुलबर्गा) अशी मृतांची नावे आहेत. मालट्रकमध्ये (क्रमांक एम. एच. २५/ यू. २३१५)चिखर्डे (ता. बार्शी) येथून कांदा भरला होता.
२१ डिसेंबर रोजी हा ट्रक सोलापूर-पुणे महामार्गावरुन बंगळुरूकडे जाताना पहाटे सव्वातीन वाजता हा ट्रक शेतकी फार्मजवळ आला असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेली लक्झरी बस (क्रमांक के. ए. ३२/ सी. ८४०८) ने ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील प्रवाशांपैकी अनिता चंद्रकांत पवार, तारानाथ बसण्णा उर्फ बसवराज पवार हे दोघे जागीच ठार झाले तर अशोक तारासिंग पवार (रा. गोळाबी, ता. आळंद, जि. गुलबर्गा,कर्नाटक) हा जखमी झाला.