माळशिरस : थंडगार माठातलं पाणी... मातीच्या भांड्यातील लोणचे अन् मातीच्या भांड्यातीलच ताक, दही.... आजही वेगवेगळ्या प्रकारच्या मातीची भांडी पाहिली की ग्रामीण जीवनशैलीची आठवण होते़ सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने या मातीच्या भांड्यांना शहरी भागातूनही मोठ्या प्रमाणात मागणी होऊ लागली आहे़ त्यामुळे मेडद (ता़ माळशिरस) येथील कुंभार वस्तीत ही भांडी बनवण्याची कुंभार बांधवांची लगबग सुरू आहे.
मातीच्या भांड्यांचा वापर हजारो वर्षांपासून केला जात आहे, मात्र वर्तमानकाळात जर्मन, स्टील भांड्यांचा वापर वाढत गेला़ परिणामी मातीच्या भांड्यांची मागणी घटली, मात्र पुन्हा मातीच्या भांड्यांना मागणी वाढल्याचे दिसून येते़.
सध्या हळूहळू उष्णतेची तीव्रता वाढू लागली आहे़ ऐन उन्हाळ्यात गरिबांचा फ्रीज म्हणून मातीच्या माठांचा लौकिक आहे़ उन्हाळ्यात लोकांची तृष्णा भागवणाºया माठांची निर्मिती करण्याची तयारी मात्र जानेवारी महिन्यापासूनच केली जाते़ तालुक्यात मोजक्याच ठिकाणी माठ बनविले जात असल्याची माहिती मेडद येथील बाळू भागवत कुंभार व विकास कुंभार यांनी दिली.
आम्ही केवळ माठच बनवितो असे नाही तर तवली, रांझण, पातेले, कढई, बरणी, कुंडी, निर्धूर चुली आदी वस्तू तयार करीत आहे. या मातीच्या भांड्यांना जिल्ह्यासह साताºयातूनही मागणी असल्याचे विकास कुंभार यांनी सांगितले.
ग्रामीण व शहरी भागातही सध्या आमच्या माठांना जास्त मागणी आहे. या व्यवसायापासून नवीन पिढी दुरावत चालली आहे़ मात्र कलाकुसर वापरून भांडी तयार केली तर या व्यवसायातही संधी आहे़- बाळू कुंभार,मेडद