माढा : माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान घेण्यात आले. या मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक -निंबाळकर, राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांच्यासह ३१ उमेदवारांचे भाग्य सीलबंद झाले आहे. निमगाव येथे फेरमतदान घेण्याची मागणी रणजितसिंह निंबाळकर यांनी केली आहे. त्यामुळे निवडणूक निरीक्षक याबाबत काय निर्णय घेणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
माढा लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन महापार्टीचे शहाजहान शेख, हिंदुस्थान प्रजा पार्टीचे नवनाथ पाटील, वंचित बहुजन आघाडीचे विजयराव मोरे, भारतीय प्रजा सुराज्यचे नानासाहेब यादव, बहुजन मुक्ती पार्टीचे सुनील जाधव, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे रामचंद्र घोतुकडे, बहुजन समाज पार्टीचे आप्पा लोकरे, अखिल भारतीय एकता पार्टीच्या ब्रह्माकुमारी प्रमिला, बहुजन आझाद पार्टीचे मारुती केसकर आदी प्रमुख उमेदवारांचे भवितव्य मशीनमध्ये सीलबंद झाले आहे.
अपक्ष उमेदवार सचिन पडळकर, अजिंक्य साळुंखे, आण्णासाहेब म्हस्के, सिद्धेश्वर आवारे, दत्तात्रय खटके, दिलीप जाधव, दौलत शितोळे, नंदू मोरे, मोहन राऊत, रामदास माने, रोहित मोरे, विजयराज माने-देशमुख, विजयानंद शिंदे, विश्वंभर काशिद, सचिन जोरे, सविता ऐवळे, संतोष बिचकुले, संदीप खरात, संदीप पोळ आदी उमेदवारांचेही भवितव्य मतदान यंत्रात सीलबंद झाले आहे.
१८२ मतदान यंत्र पडले बंद- मतदान प्रक्रियेदरम्यान प्रत्यक्ष मतदानास सुरुवात करण्यापूर्वीच १८२ मतदान यंत्र पडले. मतदानापूर्वी घेण्यात आलेल्या मॉक पोलमध्ये मशीनमधील दोष समोर आल्याने या सर्व मशीन बदलण्यात आल्या. त्याठिकाणी तातडीने पर्यायी मशीनची व्यवस्था पंधरा मिनिटांत करण्यात आली. मतदान सुरू झाल्यानंतर २१ ठिकाणी मशीन बंद पडल्याच्या घटना समोर आल्या. त्यामुळे याठिकाणीही तातडीने मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या. यावेळी ६ व्हीव्ही पॅट मशीन नव्याने देण्यात आल्या. बंद पडलेल्या मशीनच्या ठिकाणी तातडीने मशीन दिल्याने मतदानापासून वंचित राहण्याचा प्रसंग मतदारांवर आला नाही.