माढा लोकसभा मतदारसंघात राजकारण तापलं आहे. भाजपाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे अकलूजच्या मोहिते पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. अखेर त्यांनी पक्षाला राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला. दरम्यान, आता माढ्यात भाजपाला आणखी एक धक्का बसला. धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनी मोहिते पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. उत्तम जानकर यांनी काल शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. वेळापूरमध्ये जानकर आणि मोहिते पाटील घराणे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी उत्तम जानकर यांनी धैर्यशील मोहिते पाटील आणि आमचे सहा महिन्यापूर्वी ठरल्याचे सांगत इनसाइड स्टोरी सांगितली.
देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे, लोकशाही वाचविण्यासाठी त्यांना उत्तर द्यावं लागेल: शरद पवार
उत्तम जानकर म्हणाले, २०१९ च्या निवडणुकीत मला उमेदवारी दिली नाही. मोहिते पाटील यांच्या परिवारालाही उमेदवारी दिली नाही. मी सरळ जयंत पाटील यांचे घर गाठले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. २०१९ च्या निवडणुकीत आम्हाला यश मिळाले नाही. मी सध्या अजित पवार गटात आहे. पण, माझा राग भाजपावर आहे. आमच्याविरोधात त्यांचा प्लॅन शिजत होतो, माळशिरसमध्ये मोहिते पाटील आणि उत्तम जानकरां ऐवजी संस्कृती सातपुते यांना आमदार करायचे आणि राम सातपुतेंना सोलापूरातून निवडून आणायचं,असा प्लॅन होता. २०१९ ला आम्ही दोघही फसलो होतो. पण, यावेळी मात्र आमचा हा प्लॅन काही आजचा नाही. बाळदादा यांना माहिती नसेल पण धैर्यशील मोहिते पाटील आणि आम्ही सहा महिन्यापूर्वी माढ्याचा प्लॅन तयार केला आहे, असंही उत्तम जानकर म्हणाले.
सहा महिन्यापूर्वी प्लॅन केला
"सहा महिन्यापूर्वी आम्ही प्लॅन तयार केली, की तुम्ही तिकीट मागायचं आणि मीही तिकीट मागायचं, या प्लॅनमधील यांना माहिती होऊ दिली नाही. सोलापूरमध्ये आम्ही हजारो कार्यकर्ते राबत होते. पण, मला कल्पना होती हे तिकीट दिले जाणार नाही. धैर्यशील मोहिते पाटील गावागावत फिरत होते. मी त्यांना सांगितलं तुम्ही लोकसभेसाठी इच्छुक आहे म्हणून सांगा, त्यांनी एक दिवस तसं सांगितलं. यानंतर पुढं लढाई तयार झाली. हे सगळं घडल्यानंतर आख्खा तालुका हादरला, मला विमानाने नागपूरला घेऊन गेले. ते मला सगळं द्यायला तयार होते, बावनकुळे मला म्हणाले तुम्हाला काय हवं आहे ते सांगितलं नाही. मी त्यांना फक्त माझ्या लोकांची दहा वर्षे वाया गेली त्याचा हिशोब मागायला आलो आहे असं मी त्यांना सांगितलं, असंही उत्तम जानकर म्हणाले.
"दगा देणं हे आमच्या रक्तात नाही, जर शब्द दिला तर तो पाळलाच पाहिजे. मोहिते पाटील थांबत नाहीत म्हणून त्यांच्याविरोधात लेखणी सुरू आहे. एक दोन दिवसात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करतील, असा गौप्यस्फोटही जानकर यांनी केला. 'मला या सरकारला सांगायचं आहे, तुम्ही फक्त मोहिते पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा. मी धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार करणार आणि निकालादिवशी मिरवणूक काढल्याशिवाय राहणार नाही, असंही जानकर म्हणाले.