माढा लोकसभा मतदारसंघात जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. भाजपाने माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी झाल्यानंतर अकलूजचे धैर्यशील मोहिते पाटील नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यानंतर आता मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आता उद्या रविवारी १४ एप्रिल रोजी २००४ नंतर पहिल्यांदाच तीन बडे नेते एकत्र येणार आहेत.
मंडीतून कंगना रणौत विरोधात विक्रमादित्य सिंह! काँग्रेसकडून लोकसभेसाठी १६ उमेदवारांची यादी जाहीर
धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशा आधी खासदार शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील यांच्या 'शिवरत्न' या निवासस्थानी सकाळी भोजन करणार आहेत. हे दिग्गज नेते पुन्हा एकत्र येणार आहेत, यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात बदल होणार असल्याच्या चर्चा जोरदार सुरू आहेत.
उद्या धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीतील शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. तर दुसरीकडे उद्या सकाळी ११ वाजता सुशीलकुमार शिंदे आणि खासदार शरद पवार अकलूजमध्ये येणार आहेत. या दिग्गज नेत्यांच्या भेटीमुळे सोलापूर, माढा लोकसभा मतदारसंघात मोठ्या घडामोडी घडू शकतात, अशा चर्चा सुरू आहेत.
धैर्यशील मोहिते पाटलांचा उद्या पक्षप्रवेश
धैर्यशील मोहिते पाटील उद्या ४ वाजता राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे आता माढा लोकसभा मतदारसंघातील समीकरण बदलणार असल्याचे बोलले जात आहे.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांची टीका
उद्या अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी शरद पवार, सुशील कुमार येणार आहेत, यावरुन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी टीका केली. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, 'काही लोक न बोलावतात जातात, तर काही काही मुद्दाम बोलावतात. त्याचा परिणाम एखाद्याला वैयक्तिक राजकीय फायदा होत असला तरी कोण कोठे गेले आणि कोण कोठे आले? यावरुन लोकांच्या जीवनावर परिणार होणार नाही, अशी टीका शरद पवार आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर केली.