Sharad Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने राज्यातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत २० उमेदवारांची नावे आहेत. माढा लोकसभा मतदार संघात पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे, यामुळे आता धैर्यशील मोहिते पाटील नाराज असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत, दरम्यान काल दुपारी अकलूज येथील मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर नेत्यांची बैठकही झाली आहे. या बैठकीत अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर, शेकापचे जयंत पाटील, शिवसेनचे माजी जिल्हाध्यक्ष संजय कोकाटे उपस्थित होते.
शिवसेना २२, काँग्रेस १६, राष्ट्रवादी १०; असे आहे महाविकास आघाडीतील संभाव्य जागावाटप
माढा लोकसभा मतदार संघातून यावेळी धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक होते, पण यावेळी पु्न्हा एकदा भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे मोहिते पाटील नाराज असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे काल रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह अन्य नेत्यांनी मोहिते पाटलांसोबत बैठक घेतली. यामुळे आता पुन्हा एकदा मोहिते पाटील यांच्यासह रामराजे नाईक निंबाळकर खासदार शरद पवार यांच्यासोबत येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. काल झालेल्या बैठकीत उमेदवारी कोणाला द्यायची याबाबत चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, काही नेत्यांनी मोहिते पाटलांनी शरद पवार यांच्या पक्षातून उमेदवारी घ्यावी अशी मागणी केली आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष संजय कोकाटे म्हणाले, धैर्यशील मोहिते पाटील यांनी खासदार शरद पवार यांच्या पक्षाकडून लढावं. माझी अपेक्षा आहे मोहिते पाटलांनी 'तुतारी' हातात घ्यावी. मी शिवसेनेचा राजिनामा दिला आहे. भाजपच्या विरोधातील उमेदवार हा शरद पवार यांच्या पक्षाचा असणार, असंही कोकाटे म्हणाले.
अकलूज येथील झालेल्या बैठकीत शेकापचे जयंत पाटील उपस्थित होते, जयंत पाटील यावेळी म्हणाले, आजच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा केलेली नाही. पण, ही अकलुजची भूमीने राजकीय घडामोडींना कलाटणी देण्याची कामगिरी या भूमीने केली आहे. ती यापुढेही व्हावे अशी माझी अपेक्षा आहे.
रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, राजकीयदृष्या बैठकीत कोणतीही चर्चा झालेली नाही. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या तब्येतीची चौकशी केली, असंही नाईक निंबाळकर म्हणाले.
गिरीष महाज यांनी मोहिते पाटलांची भट घेतली
भाजपचे नेते गिरीष महाजन यांनी काल रात्रीच धैर्यशील मोहिते पाटील यांची भेट घेतली. यावेळी अकलूजमध्ये त्यांच्या गाडीसमोर कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. गिरीष महाजन म्हणाले, पक्ष मोठा झाला की पक्षात मत मतांतर होत असतात. दादांचा शब्द आमच्यासाठी मोठा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मला आज इकडे पाठवले आहे, आमच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे, असंही महाजन म्हणाले.