माढा: आपल्या राहत्या कोपींच्या वसाहतीपासून उसतोडीसाठी भल्या पहाटे सहा वाजता ऊसतोड मजूर घेऊन निघालेला ट्रॅक्टर उसाच्या गाडीसह एका विहिरीत पडून कामगारांच्या अवघ्या तीन ते चार वर्षांच्या एकूण तीन मुलांचा झोपेत असतानाच त्या विहिरीतील पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. ही घटना दि. २ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शिंगेवाडी (ता. माढा) येथे घडली. यात रिंकू सुखलाल वसावी (वय ३), आरव वसंत पाडवी (४), नितेश शिवा वसावी (३, सध्या सर्व रा. शिगेवाडी, ता. माढा) अशी विहिरीत बुडून मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत. याबाबत सुखलाल करमा वसावी (रा. पिंपळबारी, ता. धडगाव, जि. नंदुरबार) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. या घटनेची माहिती मिळताच गावात सर्वत्र शोककळा पसरली अन् ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी सुखलाल करमा वसावी हे पिंपळबारी (ता. धडगाव, जि. नंदुरबार) येथील रहिवासी असून, ते ऊसतोड कामगार आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील पाडली (ता. धडगाव) येथील उसतोड मुकादम खिमजी जालम्या तडवी याने उसतोडणीसाठी फिर्यादीसह इतर ऊसतोड कामगारांची एक टोळी तयार केली होती. दि. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी मुकादम खिमजी याने ऊसतोडणीसाठी शिंगेवाडी येथे ऊसतोड कामगारांना आणले होते. शिंगेवाडी येथील नागनाथ कोंडिबा शिंदे यांच्या शेतात ते राहण्यास होते. २ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तुकाराम मुरलीधर शिंदे यांच्या शेतामध्ये ऊसतोडणी असल्याने कानिफ मच्छिंद्र परबत (रा. शिंगेवाडी) यांचा एमएच-४५, एएल-४७५३ या ट्रॅक्टरला ट्रॅक्टरगाडी जोडून मुकादम खिमजी हा फिर्यादी व फिर्यादीची पत्नी सायकू सुखलाल वसावी, त्याची मुलगी रिंकू, ऊसतोड जोडीदाराची पत्नी निमा शिवा वसावी, तिचा मुलगा नितेश शिवा वसावी व परमिला वसंत पाडवी व तिचा मुलगा आरव वसंत पाडवी यांना घेऊन निघाला होता.
ट्रॅक्टर मुकादम खिमजी जालम्या तडवी हा स्वतः चालवत होता. या दरम्यान नागनाथ कोंडिबा शिंदे यांच्या शेतातील बिरोबा मंदिराजवळील विहिरीजवळ ट्रॅक्टर आला असता ट्रॅक्टरचालक मुकादम खिमजी याला शेतामध्ये विहीर असल्याचे माहिती असतानासुद्धा हयगयीने व धोकादायक ट्रॅक्टर चालविल्यामुळे ट्रॅक्टर गाडीसह विहिरीतील पाण्यात पडला. यावेळी प्रसंगावधान राखून ज्यांना पोहता येत होते ते पाण्याबाहेर पडले आणि महिलांनाही पाण्यातून बाहेर काढले. मात्र, ट्रॅक्टरच्या हेडवर बसलेली लहान तीन मुले ही मात्र विहिरीतील पाण्यात बुडून मृत्युमुखी पडली. यावेळी ट्रॅक्टरवरील चालक मुकादम खिमजी जालम्या तडवी हा अपघातानंतर विहिरीतून बाहेर येत घटनेचे गांभीर्य ओळखून पसार झाला. त्याच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाच मोटारी लावून २० फूट पाणी काढले
घटनेची माहिती समजताच गावकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेऊन एकूण पाच विद्युत मोटारींच्या साहाय्याने विहिरीत असलेले २० फूट पाणी बाहेर काढले आणि एका मोठ्या क्रेनच्या साहाय्याने ट्रॅक्टर व ट्रॅक्टरगाडी बाहेर काढली. ट्रॅक्टर गाडीसह विहिरीत पडून तब्बल बारा तास उलटल्यानंतर सदरच्या मृत पावलेल्या तीन मुलांवर कुईवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्यांना नंदुरबार येथील त्यांच्या घराकडे अंत्यविधीसाठी पाठवण्यात आले.