आप्पासाहेब पाटील
सोलापूर - कोरोनानंतर प्रथमच काही अटी व नियमांच्या अधीन राहून पंढरपुरात माघवारीचा सोहळा होत आहे. माघवारी काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, गर्दीवर नियंत्रण रहावे यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्ताबाबत योग्य ते नियोजन केले आहे. यंदाच्या माघवारीत सहभागी होणार्या वारक-यांवर व वारीतील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून त्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
येत्या १२ फेब्रुवारीला पंढरपुरात माघी वारी सोहळा होतो आहे. माघ वारी ही कोरोनाच्या संकटकाळात पार पडत असल्याने जिल्ह्यातील सर्व संबंधित विभाग योग्य नियोजन करून आपापली जबाबदारी पार पाडत आहेत आरोग्य सुविधा उपलब्ध ठेवण्याबाबत आरोग्य विभागाने नियोजन केले आहे. तसेच कोरोना चाचणी व लसीकरण केंद्राची ठिकाणे निश्चित करून मुबलक औषधसाठा ठेवला आहे. मंदिर परिसर, नदीपात्रातील वाळवंट, ६५ एकर परिसर स्वच्छ राहील याची दक्षता घेतली जात असल्याचे सांगण्यात आले.
----------
पोलिसांचा असणार बंदोबस्त..
माघवारीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, अंमलदार, होमगार्ड असे एकूण ४०० पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.
--------
वाहनांना प्रवेश बंदी, पार्किंगचे नियोजन...
माघ वारी दरम्यान पंढरपूर शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये म्हणून शहरातील महत्त्वाच्या रस्त्यावर एकेरी वाहतूक, पार्किंग नियोजन, शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांना काही ठिकाणी प्रवेश बंदी करून वाहतूक व्यवस्थेबाबत योग्य तो बदल पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्याचे जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी सांगितले.
---------
माघवारीचा सोहळा होत आहे. वारीत सहभागी होणा-या भाविकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे. मास्क परिधान करावे, डोस घेतलेले प्रमाणपत्र जवळ बाळगावे, सीसीटीव्ही व पीए सिस्टीमबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल.
- तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण