दीपक दुपारगुडे, सोलापूर: माघी यात्रा कालावधीत पंढरपूर शहरात शेकडो व्यावसायिकांची अंदाजे कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली आहे. यामुळे पंढरपूर शहरासह राज्यातून यात्रा कालावधीत व्यवसायासाठी आलेले व्यावसायिक आनंदी झाले आहेत.
पंढरपुरात माघी यात्रेनिमित्त लाखो भाविक एकत्र आले होते. आलेल्या भाविकांची गर्दी बसस्थानक, स्टेशन रोड, अर्बन बँक, प्रदक्षिणा मार्ग, विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, गजानन महाराज मठ, श्रीसंत कैकाडी महाराज मठ, श्रीसंत तनपुरे महाराज मठ, चंद्रभागा वाळवंट, दर्शन रांग व पत्राशेड आदी परिसरात भाविकांची गर्दी होती. यामुळे या परिसरात पंढरपुरातील जिल्ह्यातून आलेल्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली होती. यामध्ये प्रसादाचे साहित्य, खाण्याचे पदार्थ, खेळण्यांच्या दुकानांचा सहभाग होता. मंदिर परिसरात देवाचे फोटो, पूजेसाठी आवश्यक साहित्य, देवांच्या मूर्ती, विविध प्रकारची भांडी अशी दुकाने आहेत.
माघी यात्रेच्या कालावधीत प्रत्येक दुकानदाराचा किमान दिवसाला तीन हजार ते १ लाख रुपयांचा व्यवसाय झाला. पंढरपुरात यात्रा कालावधीत हजारो दुकाने असतात. यामुळे या तीन दिवसांच्या कालावधीत पंढरपुरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे.
एक भाविक किमान ५०० रुपये खर्च करतो...
मंदिर परिसरात किमान शंभरच्या आसपास पूजा आर्टिकलची दुकाने आहेत. तर, २५हून अधिक भांडी विक्रीची दुकाने आहेत. त्याचबरोबर शहरातील गर्दी असणाऱ्या दुकानांवर छोटी मोठी दुकाने थाटण्यात येतात. पंढरपुरात अंदाजे ५ लाख भाविक आले.