पंढरपूर शहरात परमिट असलेल्या २००० ते २५०० च्या आसपास रिक्षा आहेत. कोरोनामुळे हे सर्व रिक्षाचालक बसून आहेत. त्यामुळे त्यांना कुटुंबांचा उदरनिर्वाह करणे आवघड झाले आहेे. अशातच राज्यातील परमीट रिक्षाधारकांना प्रत्येकी १ हजार ५०० रुपये अनुदान देणार असल्याचे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले आहे. ही रक्कम संबंधित रिक्षाचालकांच्या बँक खात्यावर ऑनलाईन जमा होणार आहे.
रिक्षा परवानाधारकांच्या खात्यावर ही रक्कम थेट जमा करता यावी. यासाठी परिवहन विभागामार्फत ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येत आहे. त्यामध्ये परवानाधारक रिक्षाचालकांना आपला आधार क्रमांक, वाहन क्रमांक व अनुज्ञप्ती क्रमांक याची माहिती ऑनलाईन पद्धतीने भरावी लागणार आहे. त्यानंतर रिक्षाचालकांच्या कागदपत्रांची खातरजमा करण्यात येईल. ती झाल्यानंतर आधार क्रमांकाशी जोडणी असलेल्या बँक खात्यांमध्ये ठरविण्यात आलेली रक्कम ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या सानुग्रह अनुदानाची रक्कम वेळेवर लाभधारकांच्या खात्यावर जमा व्हावी, यासाठी सर्व रिक्षा परवानाधारकांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी तत्काळ जोडणी करून घ्यावे, असे आवाहन अनिल परब यांनी केले आहे. पंढरपुरात शहरात मोठ्या प्रमाणात परमिट असलेले रिक्षाधारक आहेत. त्यामध्ये अनेकांचे मोबाईल आधारकार्डशी लिंक केलेले नाहीत. यासाठी रिक्षा परवानाधारकाला आपले बँक खाते आधार क्रमांकाशी जोडावे लागणार आहे. त्याचबरोबर अनेकांना अर्ज भरायचा आहे; परंतु कोरोनामुळे शहरातील महा ई-सेवा केंद्रही बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांची धावपळ सुरू आहे. त्याचा फायदा घेत काही महा ई-सेवा केंद्रचालक छुप्या पद्धतीने रिक्षाचालकांचा मोबाईल क्रमांक आधार नंबरशी लिंक करून देत आहेत. त्यामुळे शहरातील काही महा ई-सेवा केंद्र सुरू करावी, अशी मागणी रिक्षाचालकांमधून होत आहे.
तहसील कार्यालयात केली सोय
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. महा ई-सेवा केंद्र सुरू केले की, विविध कागदपत्रे मिळविण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यामुळे महा ई-सेवा केंद्रे बंद ठेवण्याचे आदेश दिले होते परंतु रिक्षाचालकांना अनुदान मिळवण्यासाठी अर्ज भरता यावा, त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता व्हावी. यासाठी तहसील कार्यालयात महा ई-सेवा केंद्रचालकांना बसविण्यात येईल. त्याठिकाणी कोरोनाचे नियम पाळून रिक्षाचालकांचे अर्ज व मोबाईल क्रमांक आधारकार्डाशी लिंक केला जाईल, असे तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी सांगितले.
कोट :::::
रिक्षाचालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी शहरातील दोन महा ई-सेवा केंद्र चालू करण्यास परवानगी देऊ.
- सचिन ढोले, प्रांताधिकारी, पंढरपूर
कोट ::::
महा ई-सेवा केंद्र बंद असल्याने अनुदान मिळविण्यासाठी अर्ज भरता येणार नाही. त्याचबरोबर मोबाईल क्रमांकदेखील आधार कार्डाशी लिंक करणे अवघड झाले आहे. शहरातील महा ई-सेवा केंद्रे सुरू करावीत.
- आदित्य ठोकळे, रिक्षाचालक, पंढरपूर