सोलापूर : राज्यात ज्या पद्धतीने शरद पवार एकापाठोपाठ एक असे दिग्गज नेत्यांना पक्षात घेत इतर पक्षांना धक्का देत आहेत. त्या पद्धतीने जिल्ह्यात अजितदादांच्या पक्षाला एका मागून एक हादरे बसत आहेत. अजितदादा गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्या पाठापोठ आता जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांनी अजितदादांच्या पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मोहोळपाठोपाठ सांगोल्यातही बंड होणार, हे स्पष्ट झाले आहे.
दीपक साळुंखे-पाटील यांचा राजीनामा
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांनी आपल्या पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आगामी विधानसभा निवडणूक अपक्ष लढवणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी दीपक साळुंखे म्हणाले, माझा पक्ष सध्या महायुतीत असून महायुतीमधून मी विधानसभेसाठी उमेदवारांची मागणी केली होती. परंतु सांगोला विधानसभेची जागा विद्यमान आमदारांना मिळणार असल्याचे वरिष्ठ पातळीवरून समजले. म्हणून मी माझ्या सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांशी चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. या पत्रकार परिषदेला तानाजी पाटील, डॉ. पीयुष साळुंखे, यशराजे साळुंखे, विजय येलपले, विश्वनाथ चव्हाण, शिवाजी बनकर आदी उपस्थित होते. अपक्ष की मशाल घेणार दीपक साळुंखे यांच्या राजीनामा दिल्यामुळे ते अपक्ष लढणार की " मशाल " हाती घेणार हे येत्या दोन-चार दिवसाच्या कालावधीत स्पष्ट होणार आहे. सांगोल्याची जागा महाविकास आघाडीतून कोणाला सुटणार, यावर गणित ठरणार आहे. सांगोल्याच्या जागेसाठी ठाकरे गट आग्रही असल्याचे सांगण्यात आले.
शरद पवारांच्या भेटीनंतर पाटील म्हणाले, जागा वाटपानंतर भूमिका ठरवू
मोहोळ : अजितदादा गटाच्या मुख्य प्रवक्ते पदाचा राजीनामा दिलेले उमेश पाटील यांनी मागील काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानुसार मंगळवारी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. याबाबत उमेश पाटील म्हणाले, मोहोळ विधानसभेची जागा कोणत्या पक्षाला सुटणार हे येत्या दोन तीन दिवसात निश्चित झाल्यानंतरच आपली भूमिका जाहीर करणार आहे.
शरद पवारांच्या भेटीनंतर उमेश पाटील म्हणाले, मोहोळ तालुक्यातील राजन पाटील परिवाराच्या राजकारणाचा अस्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. राजन पाटलांनी यापूर्वी भाजपामध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता. नंतर आता अजित पवारांसोबत आहेत त्यांच्यासोबत असतानाच शरद पवारांना भेटून ही तुम्ही काळजी करू नका. निवडणुकीच्या तोंडावर मी तुमच्यासोबत येणार आहे असे सांगत आहेत. अखेर ते कोणत्याही पक्षात जाऊ द्या. कुठेही जाऊ द्या, तुमचा जो उमेदवार असेल, त्याला आमचा विरोध कायम असेल ही भूमिका घेऊन उमेश पाटलांनी घेतली आहे.