Barshi Vidhan Sabha ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी बार्शी विधानसभा मतदारसंघात दाखल झालेल्या ३१ उमेदवारांपैकी ११ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. यामुळे निवडणुकीच्या आखाड्यात २० उमेदवार राहिले आहेत. यात विविध राजकीय पक्षांचे सहा उमेदवार आहेत तर १४ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
उमेदवारांची संख्या जास्त असल्याने दोन मतदान यंत्रे लागणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी एफ. आर. शेख म्हणाले की, बार्शी विधानसभा मतदारसंघात छाननीनंतर ३१ उमेदवारी अर्ज शिल्लक होते. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटच्या दिवशी ११ अपक्ष उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. भाऊसाहेब आंधळकर, परमेश्वर पासले, युवराज काटे, आनंद काशीद विजय साळुंखे या पाच जरांगे पाटील समर्थक तर नंदकुमार जगदाळे, दिलीप साठे, प्रमोद घोडके, रामेश्वर कुलकर्णी, अनिल गवसाने, गुलमोहम्मद अतार या स्वतंत्रपणे अपक्ष अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.
आता निवडणुकीच्या आखाड्यामध्ये २० उमेदवार शिल्लक राहिले आहेत. यामध्ये मनोज कांबळे (बहुजन समाज पार्टी), दिलीप सोपल (उद्धवसेना), राजेंद्र राऊत (शिंदेसेना), आनंद यादव (महाराष्ट्र राज्य समिती), किशोर गाडेकर (रासप), धनंजय जगदाळे (वंचित बहुजन आघाडी) या राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षाच्या उमेदवाराचा समावेश आहे. तर अब्बास शेख, आकाश दळवी, इस्माईल पटेल, अॅडव्होकेट किरण मांजरे, किशोर देशमुख, साहेबराव देशमुख, मधुकर काळे, मोहसीन पठाण, मोहसीन तांबोळी, लालू सौदागर, वर्षा कांबळे, विनोद जाधव, शरीफ शेख व समीर सय्यद या १४ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. अपक्ष उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यानंतर तात्काळ चिन्हांचीदेखील वाटप करण्यात आले आहे.
जरांगे-पाटील समर्थक देशमुख यांचा अर्ज कायम
जरांगे पाटील समर्थक सहा जणांनी अर्ज दाखल केले होते. यातील पाच जणांनी माघार घेतली. तर आम्ही सर्व एक म्हणत अर्ज दाखल केलेले बाजार समितीचे माजी संचालक साहेबराव देशमुख यांनी मात्र आपला अर्ज कायम ठेवला. आज दिवसभर देशमुख हे नॉट रिचेबल होते.