अशोक कांबळे, मोहोळ, लोकमत न्यूज नेटवर्क |
Mohol Vidhan Sabha ( Marathi News ) : मोहोळ विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. मागील निवडणुकीत जे एकत्र होते. त्यांच्यातच फूट पडली आहे. उमेदवार कोण आहेत, यापेक्षा मोहोळच्या पाटीलकीसाठी चढाओढ लागली आहे. त्यामुळे एका बाजूला अनगरचे पाटील आणि दुसऱ्या बाजूला नरखेडचे पाटील असेच चित्र सध्या दिसत आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघात २००९मध्ये माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, तर २०१४च्या निवडणुकीत अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष रमेश कदम, २०१९च्या निवडणुकीत यशवंत माने हे तिघे राष्ट्रवादीकडून आमदार बनले.
मागील २०१९च्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून यशवंत माने, शिवसेनेकडून नागनाथ क्षीरसागर, तर अपक्ष म्हणून माजी आ. रमेश कदम, शिवसेनेचे तिकीट नाकारलेले मनोज शेजवाल यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज ठेवला होता. त्यामुळे चौरंगी लढत झाली होती. तेव्हा आमदार यशवंत माने यांच्या प्रचाराची धुरा पंढरपूर विभागातून माजी आमदार स्वर्गीय भारत भालके, उत्तर तालुक्यामधून बळीरामकाका साठे, तर मोहोळ तालुक्यातून माजी आमदार राजन पाटील, उमेश पाटील, मानाजीराव माने, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्यासह काँग्रेससोबत होती. शिवसेनेचे उमेदवार नागनाथ क्षीरसागर यांच्यासाठी पंढरपूर विभागातून कल्याणराव काळे, प्रशांत परिचारक गट, शिवसेना, भाजप, विठ्ठल परिवार, पांडुरंग परिवार, तर उत्तर तालुक्यातून दिलीप माने यांच्यासह शिवसेनेचे गणेश वानकर, मोहोळ तालुक्यातून खासदार धनंजय महाडिक यांचा भीमा परिवार, विजयराज डोंगरे यांच्या लोकशक्ती परिवारातील नेते झटले.
यंदाच्या निवडणुकीत अजित पवार गटाचे उमेदवार आ. यशवंत माने यांच्याबरोबर माजी आमदार राजन पाटील, भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सेना आहे, तर राजू खरे यांच्याबरोबर शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, उमेश पाटील, मनोहर डोंगरे यांच्यासह उद्धवसेना, काँग्रेसचे पदाधिकारी आहेत.
कदमांच्या भूमिकेकडे लक्ष
राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी रमेश कदम यांची उमेदवारी शरद पवार गटाकडून ऐनवेळी काढण्यात आल्याने रमेश कदम यांना मानणारा कार्यकर्ता आता कोणता निर्णय घेणार, कार्यकर्त्यांबरोबर माजी आमदार रमेश कदम यांची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.