Mohol Vidhan Sabha ( Marathi News ) :मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी सिद्धी रमेश कदम यांना जाहीर होताच मोहोळ येथील सर्वपक्षीय समितीच्या नेत्यांनी तातडीने बारामती येथे गोविंद बाग गाठून शरद पवार यांची भेट घेतली. कदम यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घ्या, असा सल्ला दिला आहे. त्यानंतर या समितीतील काही मंडळींनी जयंत पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
दरम्यान, माजी आमदार रमेश कदम यांच्यासह अधिकृत उमेदवार सिद्धी कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवारांची तुतारी हातात घेतलेल्या संजय क्षीरसागर यांची अवस्था इकडे ना तिकडे अशी झाली आहे. त्यांनीही २८ ऑक्टोबरला सायंकाळी गोविंद बाग गाठली आहे. त्यांनीही शरद पवार यांची भेट घेतली असून, पवार यांनी ठीक आहे, बोलतो, असे सांगितले.
जिल्हाध्यक्षांनी काय दावा केला?
"मोहोळची उमेदवारी कोणत्याही पदाधिकाऱ्याला विश्वासात न घेता जाहीर केली होती. त्यामुळे बारामती येथे जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्या उमेदवारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शरद पवार यांनी जयंत पाटील यांना फोनद्वारे बोलून उमेदवारी बदलण्यासाठी सांगितले असून, राजू खरे यांच्या नावाचा संदर्भ दिला आहे," असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांनी केला आहे.
कदम यांची उमेदवारी रद्द?
मोहोळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सिद्धी रमेश कदम यांचा एबी फॉर्म रद्द करण्यात यावा अशा आशयाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सहीचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याऱ्यांना पाठविलेले पत्र सोमवारी व्हायरल झाले. पक्षाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने याबाबत दजोरा दिला आहे.