Maharashtra Vidhan Sabha ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आता दोन दिवस हातात आहेत. तरी महायुती आणि महाविकास आघाडीत उमेदवारीचा गुंता कायम आहे. सोलापूर शहर मध्य, पंढरपूर, माळशिरस आणि माढ्यात दोन्हीकडून उमेदवार जाहीर झाले नाहीत. त्यामुळे उमेदवारीचा तिढा कधी सुटणार, याची उत्सुकता लागली आहे. जिल्ह्यातील ११ मतदारसंघात उमेदवारी दाखल करण्याची लगबग सुरू आहे. पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर होत आहे. सोलापूर शहर मध्यची जागा मविआतून काँग्रेसकडेच राहणार, हे जवळपास स्पष्ट आहे. कारण, या मतदारसंघातून मुस्लिम उमेदवार देण्याची मागणी आहे. त्यातूनच बाबा मिस्त्रींचे नाव पुढे आले आणि त्यांनी अर्ज घेतले आहेत. दुसरीकडे महायुतीतून ही जागा भाजपला सोडू नये, अशी भूमिका शिंदे गटाची आहे. शिवाय भाजपच्या एका गटानेही विरोधात पत्र दिले आहे. त्यामुळे देवेंद्र कोठे यांना उमेदवारी मिळणार की नाही, हे ठरले नाही.
पंढरपूर-मंगळवेढ्यातून भाजपकडून आ. समाधान आवताडे यांना उमेदवारी मिळणार आहे. मात्र, जाहीर न झाल्याने तेही टेन्शनमध्ये आहेत. महाविकास आघाडीकडून काँग्रेस लढणार की शरद पवार गटाला उमेदवारी मिळणार, हे स्पष्ट नाही. यामुळे भगीरथ भालके यांची गोची झाली आहे. शिवाय प्रशांत परिचारक अपक्ष लढणार की पवार गटाची उमेदवार घेणार, हे स्पष्ट नाही. माढ्यातून शरद पवार गटाची उमेदवारी मोहिते-पाटलांना की शिंदेंना मिळणार, याकडे लक्ष लागले आहे. अभिजित पाटलांचे नाव आहेच. महायुती मात्र, नव्या उमेदवाराच्या शोधात आहे. माळशिरसमधून शरद पवार गटाकडे उत्तम जानकरांचे नाव आहे. ते सोमवारी अर्जही भरणार आहेत. महायुतीतून आ. राम सातपुतेंऐवजी स्थानिक उमेदवार देण्याची तयारी सुरू झाली आहे.
शरद पवार गटाला मोहोळमध्ये टेन्शन
मोहोळच्या उमेदवारीवरून शरद पवार गटामध्ये टेन्शन वाढले आहे. दररोज नवनवीन नाव पुढे येत आहे. त्यामुळे पहिल्या यादीत मोहोळचे उमेदवार ठरले नाहीत. संजय क्षीरसागर, नागनाथ क्षीरसागर, रमेश कदम, राजू खरे, लक्ष्मण ढोबळे यांची नावे सध्या तरी आहेत.
करमाळा अन् बार्शीत भाजप की शिंदे गट?
करमाळ्याची जागा भाजपला की शिंदे गटाला हे स्पष्ट नाही. भाजपकडून रश्मी बागल व गणेश चिवटे यांचे नाव आहे. तर शिंदे गटाचे महेश चिवटे अथवा त्यांचे बंधू मंगेश चिवटे यांचे नाव पुढे येत आहे. तर बार्शीतून आ. राजेंद्र राऊत हे भाजप की शिंदे गटाकडून लढणार, हे ठरायचे आहे.