NCP Ajit Pawar ( Marathi News ) : माढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्याही उमेदवारीचा तिढा अनेक दिवसांपासून सुटलेला नव्हता. मात्र काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने अभिजीत पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीनेही आपले पत्ते खुले केले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने माढ्यासाठी मीनल साठे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. माढ्यातून विद्यमान आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजीत शिंदे हे अपक्ष उभे असल्याने या मतदारसंघात तिरंगी सामना रंगणार आहे.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांनी अजित पवारांना साथ दिली होती. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे यांनी अजित पवारांपासून फारकत घेत शरद पवारांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु पवार यांनी बबन शिंदे यांचे पुत्र रणजीत शिंदे यांना उमेदवारी न देता विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे रणजीत शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आज माढ्याच्या माजी नगराध्यक्षा मीनल साठे यांना उमेदवारी दिली आहे. साठे यांच्या कुटुंबाला राजकीय वारसा लाभला असून त्यांचे सासरे माढ्याचे माजी आमदार राहिलेले आहेत.
माढ्यात सुरू होती रस्सीखेच
माढा विधानसभा मतदारसंघात आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनीही शरद पवारांकडे उमेदवारीची मागणी केली होती. त्यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू होती. तर आमदार बबनदादा शिंदे यांच्या नावच्याही चर्चा सुरू होत्या. मात्र काल अभिजीत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. लोकसभा निवडणुकीत अभिजीत पाटील यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता.