Sangola Vidhan Sabha ( Marathi News ) :सांगोला विधानसभा मतदारसंघ जिल्ह्यात उच्चांकी ७८.१४ टक्के मतदान झाल्यामुळे निकालाची उत्कंठा वाढली आहे. यंदाच्या निवडणुकीत वाढलेली मतदानाची टक्केवारी व सुमारे १ लाख २४ हजार ३५२ महिला मतदारांनी उस्फूर्तपणे केलेले मतदानाचा फायदा कोणाला होणार, याकडे लक्ष लागले आहे. निवडणुकीसाठी १३ उमेदवार बनल सांगोला विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र खरी लढत शिंदेसेनेचे उमेदवार आमदार शहाजी बापू पाटील, उद्धवसेनेचे उमेदवार दीपकआबा साळुंखे पाटील व शेकापचे उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यात तुल्यबळ तिरंगी लढत होती. दरम्यान सांगोला विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीने झालेल्या मतदानात एकूण ३ लाख ३५ हजार ३७९ मतदानांपैकी १ लाख ३६ हजार २३६ पुरुष तर १ लाख २४ हजार ३५२ महिला मतदार असे एकूण २,६०,५८९ (७८.१४ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. मतदारांनी सर्वच मतदान केंद्रावर गर्दी करून रांगेतून रात्री उशिरापर्यंत उत्साहात मतदान केले. विशेषता महिलावर्ग मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडल्याचे प्रथमच पहावयास मिळाले कदाचित लाडकी बहीण योजनेचाही मतदानावर प्रभाव दिसून आला आहे. दरम्यान गतवेळी माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, बाबूराव गायकवाड, भाऊसाहेब रुपनर आनंदा माने हे आमदार शहाजी बापू पाटील यांच्यासोबत होते तर काँग्रेसचे प्रा. पी सी झपके हे शेकापचे देशमुख यांच्यासोबत होते. यंदाच्या निवडणुकीत चित्र वेगळे राहिले.
पाच वर्षे एकत्र राहिलेली जय-विरुची जोडी उमेदवारीवरून फुटली. आमदार शहाजी बापू आणि दीपकआबा एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्यामुळे निवडणुकीचे चित्र बदलले. गतवेळी शेकाप सोबत राहिलेले काँग्रेसची प्रा. पी.सी. झपके यांनी दीपकआबा सोबत राहिले. तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबूराव गायकवाड यांनी दीपकआबांची साथ सोडून तर भाजपचे तालुकाध्यक्ष अतुल पवार यांनी शहाजीबापू ऐवजी शेकापचे उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख यांना पाठिंबा दिला होता. एकंदरीत राजकीय समीकरण पाहता कोळा, घेरडी व जवळा गट व सांगोला शहरातून आणि भाळवणी , महूद, कडलास, नाझरा व एखतपूर गटातून कोणाला मताधिक्य मिळणार हे पाहावे लागणार आहे.