Prakash Ambedkar ( Marathi News ) : प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बहुतांश मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र नागपूरमध्ये एबी फॉर्म घेऊन वेळेत सरकारी कार्यालयात न पोहोचल्याने वंचित आघाडीच्या एका उमेदवाराला आपला अर्ज दाखल न करता आल्याची घटना घडलेली असतानाच आता मोहोळमध्येही वंचित आघाडीच्या उमेदवाराचा अजब कारणातून अर्ज बाद झाला आहे. सूचक कमी असल्याने वंचितच्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला आहे.
मोहोळ विधानसभा मतदारसंघातून बहुजन वंचित आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले अतुल वाघमारे यांच्या अर्जाला पुरेसे सूचक नसल्याने एकमेव त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. आता एकूण २८ उमेदवारी अर्ज असून अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी किती अर्ज निघणार यावरच पुढील लढत कशी असणार हे समजणार आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं काय झालं?
नागनाथ क्षीरसागर यांच्या वतीने सोमेश क्षीरसागर यांनी विद्यमान आमदार यशवंत माने यांचे प्रमाणपत्र चुकीचे असल्याचे घेतलेल्या हरकतीवर सेक्शन ५ नुसार त्यांचे प्रमाणपत्र चुकीचे आहे किंवा नाही हे ठरविण्याचे अधिकार आम्हाला नसल्याने यशवंत माने यांचा अर्ज वैध असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी होळकर यांनी यशवंत माने यांचा अर्ज मंजूर केला आहे. तर उमेदवारी अर्जाच्या छाननीमध्ये पक्षाच्या नावानिशी भरलेले नागनाथ क्षीरसागर व माजी आमदार रमेश कदम यांचे अर्ज नामंजूर झाले. परंतु या दोघांनीही अपक्ष भरलेले फॉर्म मात्र मंजूर झाले आहेत.
मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या ३० ऑक्टोबर रोजी झालेल्या छाननीत नागनाथ क्षीरसागर यांचे चिरंजीव सोमेश क्षीरसागर यांनी यशवंत माने हे मूळ शेळगावचे आहेत. त्यांनी हल्लीचा वास्तव्याचा पुरावा तालुक्यातील मुंढेवाडीचा दाखविला आहे. परंतु त्यांचा जातीचा दाखला बुलढाणा तालुक्यातील चिखली येथून काढला आहे. त्यामुळे ते प्रमाणपत्र चुकीचे आहे, अशी हरकत घेतली होती. या हरकतीवर निर्णय देताना निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनी यशवंत माने यांचे प्रमाणपत्र चुकीचे आहे किंवा नाही हे ठरविण्याचे आम्हाला अधिकार नाहीत शिक्षण पाचनुसार ते अधिकार आम्हाला नसल्याने यशवंत माने यांचा उमेदवारी अर्ज वैद्य करण्यात आला असल्याचा त्यांनी निकाल दिला.