Karmala Madha Vidhan Sabha ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. करमाळा आणि माढा विधानसभा मतदारसंघामध्ये शेवटच्या दिवशी नावात साधर्म्य असणाऱ्यांनी उमेदवारी अर्ज भरले. त्यात करमाळ्यात तीन संजय शिंदे, माढ्यात चार अभिजीत पाटील, दोन रणजीतसिंह शिंदे मैदानात आहे. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने प्रमुख उमेदवारांची डोकेदुखी वाढल्याचं पाहायला मिळत आहे.
करमाळा विधानसभा निवडणुकीत आ. संजयमामा शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांच्यापाठोपाठ मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरीस संजय लिंबराज शिंदे (रा. खांबेवाडी, ता. करमाळा) आणि संजय वामन शिंदे (रा. दहिगाव ता. करमाळा) या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत.
माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अभिजीत पाटील यांनी अधिकृत एबी फॉर्म अर्ज दाखल केला. अभिजीत धनवंत पाटील यांनी बहुजन समाज पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय अभिजीत अण्णासाहेब पाटील, अभिजीत तुळशीराम पाटील असे चारजण एकाच नावाचे उमेदवार रिंगणात आहेत. आ. बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे व अपक्ष रणजीत मारुती शिंदे यांनीही अर्ज भरले आहे.
माढ्यात बार्शी, करमाळ्याचे उमेदवार
प्रमुख पक्षाच्या लढतीमध्ये नामसाधर्म्य असलेल्या उमेदवाराचे शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे. माढा मतदारसंघासाठी पंढरपूर, बार्शी, करमाळा येथील रहिवासी असलेल्या उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.