Sharad Pawar NCP ( Marathi News ) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सांगोला शहर व तालुका कार्यकारिणी तडकाफडकी बरखास्त केल्याचे पत्रक जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी काढल्याने ऐन विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे नेमका शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पाठिंबा कोणाला ? याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत जाहीर होणार असल्याचे बाबुराव गायकवाड यांनी सांगितले.
राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी १६ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पुनर्बाधणीच्या अनुषंगाने सांगोला शहर व तालुका कार्यकारिणीसह सर्व सेल व फ्रंटची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. नवीन निवडी जाहीर करून लवकरच नूतन कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचे पत्रकात नमूद केले आहे. दरम्यान, मंगळवारी सांगोल्यात महाविकास आघाडीचे उद्धवसेनेचे उमेदवार दीपक साळुंखे पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष धनंजय पवार यांनी पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. यानंतर त्यांच्या या वक्तव्याची शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबुराव गायकवाड यांनी दखल घेऊन सांगोला शहर व तालुका कार्यकारिणीसह सर्वच सेल व फ्रंटची कार्यकारिणी बरखास्त केली असताना तालुकाध्यक्षांना पाठिंबा देण्याचा अधिकार येतोच कोठे ? असा प्रश्न उपस्थित केला व तालुकाध्यक्ष धनंजय पवार यांनीही आपल्या पदाचा राजीनामा सोशल मीडियाद्वारे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्याकडे दिल्याचे सांगितले.
दोन दिवसांपूर्वी बारामती येथे शरद पवार यांची भेट घेतली असता खा. पवार यांनी सांगोला मतदारसंघाबाबत मी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना सविस्तर बोललो आहे, ते तुम्हास सर्व काही समजून सांगतील. त्याप्रमाणे सांगोला मतदारसंघात कार्यकर्त्यांनी काम करावे, असे सांगितले आहेत. - बाबुराव गायकवाड, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.