लोकमत न्यूज नेटवर्क, सोलापूर : माजी आमदार आणि शहर ‘मध्य’मधील माकपचे उमेदवार नरसय्या आडम यांच्या बापूजी नगरातील घरावर काही तरूणांनी दगडफेक केली. सोमवारी रात्री सात ते साडेसातच्या दरम्यान हा प्रकार घडल्याचे सांगत आडम यांनी भविष्यात माझ्यावर प्राणघातक हल्लाही होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त केली.
आडम मास्तर हे सोमवारी सायंकाळी ५ वाजता प्रचारासाठी घराबाहेर पडले. त्यानंतर रात्री काही युवकांनी त्यांच्या घरावर दगडफेक केली. आडम यांच्या पत्नी कामिनी आडम यांनी भ्रमणध्वनीवरून ॲड. अनिल वासम यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर वासम यांनी ११२ क्रमांकावर पोलिसांना घटनेची माहिती दिली. सदर बझार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे यांनी काही पोलिसांना घटनास्थळी पाठवले. त्यावेळी दगडफेक करणाऱ्या युवकांचा गोंधळ सुरू होता. वासम आणि अन्य काही जणांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्नही केला. दरम्यान, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याचे ॲड. वासम यांनी सांगितले.
दगडफेक करीत गोंधळ घालणारे कार्यकर्ते हे विरोधक असावेत. दारू पिऊन गोंधळ घालणे, विटांनी मारणे असे प्रकार सुरू होते. त्यांना रोखत असताना ॲड. अनिल वासम यांनाही धक्काबुक्की झाली. भविष्यात माझ्यावर प्राणघातक हल्लाही होऊ शकतो. याचा विचार करून ताब्यातील युवकांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मी पोलिस आयुक्तांना विनंती करतो.- नरसय्या आडम, माजी आमदार