Madha Vidhan Sabha ( Marathi News ) : माढा विधानसभेची यंदाची पंचवार्षिक निवडणूक ही चुरशीची झाली असून एकूण मतदान ७५.९० टक्के झाले आहे. त्यामुळे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत सरासरी मतदानाचा मोठा टक्का वाढल्याने नेमका याचा फायदा कोणाला होणार? याकडे कार्यकर्त्यांसह सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत स्वतः उमेदवारांसह गावोगावचे पुढारीदेखील आकडे-मोडीच्या खेळात रमल्याचे दिसत आहे. येथील सर्व उमेदवारांचे भवितव्य हे व्हीव्हीपॅट मशीनमध्ये सील बंद झाले असून २३ तारखेच्या मतमोजणीतून ते ओपन होणार आहे.
माढा विधानसभा मतदारसंघात माढ्यातील ७८ पंढरपुरातील ४२ तर माळशिरस तालुक्यातील १४ गावांचा समावेश आहे. येथे एकूण ३५५ मतदान केंद्र असून ३ लाख ५२ हजार ६९१ इतके मतदान आहे. त्यापैकी २ लाख ६७ हजार ६९१ इतके मतदान झाले आहे. या मतदारसंघात १ लाख ८३ हजार ९४८ इतके पुरुष मतदार असून त्यापैकी १ लाख ४२ हजार ६८० जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर येथे एकूण १ लाख ६८ हजार ७४० स्त्री मतदार असून त्यापैकी १ लाख २५ हजार ००९ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या बरोबरच मतदारसंघात एकूण तीन तृतीयपंथीयांपैकी दोन जणांनी मतदान केले आहे.
या मतदारसंघात एकूण १३ उमेदवार हे निवडणूक रिंगणात उभे होते. त्यापैकी खरी चुरस ही विद्यमान आ. बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह बबनराव शिंदे व शरद पवार गटाचे उमेदवार अभिजित धनंजय पाटील यांच्यात निर्माण झाल्याचे दिसून आले. तर येथून अजित पवार गटाच्या उमेदवार अॅड. मीनल साठेदेखील आपले नशीब आजमावत आहेत. मतदारातून रात्री उशिरापर्यंत मतदान करून मतदानाचा टक्का वाढवल्याने यातून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तीन तालुक्यातील मतदानाची परिस्थिती अशी राहिली
माढा विधानसभा मतदारसंघात माढ्यातील ७८ गावांचा समावेश असून येथील एकूण मतदान १ लाख ८८ हजार १२१ आहे. यापैकी १ लाख ४२ हजार १४२ जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर पंढरपूर तालुक्यातील समावेश असलेल्या ४२ गावांतील १ लाख १५ हजार ४१८ मतदारांपैकी ९० हजार ८५० जणांनी मतदान केले आहे. याबरोबरच माळशिरस तालुक्यातील समावेश असलेल्या एकूण १४ गावांतील ४९ हजार १५२ मतदारांपैकी ३४ हजार ६९९ मतदारांनी मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.