सोलापूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर सन्नाटा दिसून आला. जवळपास सर्वच कार्यकर्ते संभ्रमात दिसून आले.
फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याचे कळताच आमदार विजयकुमार देशमुख, भाजपाचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. गुलालाची उधळण केली. भाजपा कार्यकर्त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील चाणक्य असल्याच्या पोस्ट फिरवायला सुरुवात केली. कालपर्यंत शांत असलेले कार्यकर्ते आज जोमात असल्याचे पाहायला मिळाले. रामलाल चौकातील जिल्हा राष्ट्रवादी भवन, फॉरेस्ट येथील शहर राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर सन्नाटा होता. नेमकं आमच्या पक्षात काय चाललयं कळेना. कसला जल्लोष करायचा, असा प्रश्नही कार्यकर्ते उपस्थित करत होते.
काय घडलय, कशामुळं घडलंय आम्हाला काहीच माहित नाही. आम्हाला कुणाचा फोनही आला नाही. मग कुणासोबत आहोत हे कसे सांगू, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील तीन आमदारांनी दिली. राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे म्हणाले की मी आता आमच्या गावात आहे. आमच्या साखर कारखान्यावर मोळी टाकण्याचा कार्यक्रम आहे. मला कुणाचा फोन आलेला नाही. काय चाललय मला काहीच माहित नाही. तुम्ही शरद पवार यांच्यासोबत आहात की अजित पवार यांच्यासोबत असे विचारले असता, काय चाललय मलाच माहित नाही. मग कसे सांगणार?
भारत भालके म्हणाले, मी कुणासोबत आहे हे आताच कसे सांगू. भारत भालके सध्या पंढरपुरात आहे एवढच सांगू शकतो. आमदार यशवंत माने म्हणाले अजितदादांनी या निर्णयाची कल्पना आम्हाला दिली नव्हती. पण पक्षाने सायंकाळी साडेचार वाजता मुंबईत बोलावली आहे. त्यानंतर आम्ही कुणासाहेब आहोत हे सांगता येईल.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे समोर येत आहे. तसेच पवार यांच्या शपथविधीनंतर मुंडे यांचा फोनही स्वीच ऑफ येत आहे. यामुळे धनंजय मुंडे, सुनिल तटकरे आदी नेते शरद पवार यांच्यासोबत असल्याचे कळत आहे. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारही अज्ञातस्थळी रवाना झाले असून राष्ट्रवादी, शिवसेनेची पत्रकार परिषद काही वेळातच होणार आहे.