सोलापूर - राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर शहर आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आम्ही अजितदादांसोबत आहोत, असे स्पष्ट केले. तर शहरातील महेश गादेकर गटाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले आहे.
संतोष पवार म्हणाले, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. परंतु, महाराष्ट्राच्या विकासात अजित पवार यांनीही मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असे सांगितले. इतर पदाधिकाऱ्यांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे. शहराध्यक्ष भारत जाधव यांनी दुपारपर्यंत भूमिका जाहीर केली नव्हती. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे म्हणाले, आम्ही कुणासोबत जायचे हे आताच ठरवलेले नाही. पण सायंकाळपर्यंत सांगू. जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील म्हणाले, मी पवारांसोबत आहे. पण कोणत्या पवारांसोबत आहे. आताच सांगू शकत नाही. मी शरद पवार आणि अजित पवार या दोघांशीही बोलणार आहे. त्यानंतरच तुम्हाला सांगेन.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबात फूट पडल्याचं आता स्पष्ट झालं आहे. भाजपाने थेट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनाच सोबत घेत सत्ता स्थापन केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शरद पवारांना अंधारात ठेवून अजितदादांनी हा निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा रंगलेली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार यांचा हा वैयक्तिक निर्णय आहे. याला पक्षाचा पाठिंबा नसल्याचं पवारांनी म्हटलं आहे. यानंतर आता शरद पवारांच्या कन्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअॅप स्टेटस बदलून आपली नाराजी व्यक्त केली आहे. 'पक्ष आणि कुटुंब दोन्ही फुटले आहेत' असं भावनिक ट्विट सुप्रिया यांनी केलं आहे. तसेच पत्रकारांना प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे भावूक झाल्या. व्हॉट्सअॅप स्टेटस बदलून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. 'पार्टी अँड फॅमिली स्प्लिट' असं नवं स्टेटस त्यांनी ठेवलं आहे. आमच्या पक्षातच नव्हे तर कुटुंबातही फूट पडली आहे, असं त्यांनी म्हटलं.