संविधानिक व्यवस्था फक्त काँग्रेसच सांभाळू शकते - नाना पटोले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 06:01 PM2023-05-21T18:01:48+5:302023-05-21T18:04:53+5:30
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली.
सोलापूर : काँग्रेसने जीवनात कधीच असा घमंड केला नाही. अजित पवारांना काय बोलायचं आहे, हे त्यांचे मत आहे. त्याच्यावर प्रतिक्रिया देणे काही गरजेचे नसल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले. आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा मोठा भाऊ असेल, या अजित पवाराच्या विधानावर बोलताना पटोले यांनी अजित पवारांना काय बोलायचं आहे, हे त्यांचे मत आहे. आमची मागच्या काळात मिटींग झाली आहे. मेरीटच्या आधारावर प्रत्येक ठिकाणी निर्णय होतील, असे सांगितले. ते सोलापुरात पत्रकारांशी बोलत होते.
दरम्यान, बीजेपी वाल्यांना माझा सवाल आहे. केरळ मधली गाय तुमची काय लागते. गोव्यामधील गाय तुमची काय लागते. नॉर्थ ईस्ट मध्ये तुमची गाय काय लागते. हे फक्त महाराष्ट्रातील जनतेला भाजपने प्रामाणिकपणे सांगावे, असा प्रश्न पटोले यांनी आशिष शेलार यांना केला. तसेच गाय तिथे खाणारी वस्तू आहे, तर इथे आई आहे. या पद्धतीचा धार्मिक तेढ निर्माण करून, वाद करून तुम्हाला निवडणुका जिंकता येणार नाही. त्यामुळे तुमचा खरा चेहरा जनतेने ओळखला आहे. भाजपवाल्यांची गाय कधीच आई झाली नाही. गाईच्या नावाने भाजप राजकारण करते. गंगेच्या पाण्यासंदर्भात ही राजकारण करतात. त्यामुळे हिंदुत्वाचा जो बुरखा होता तो भाजपचा फाटला आहे. त्यामुळे कर्नाटक राज्यात हनुमानजी काँग्रेससोबत आले, रामजी काँग्रेससोबत आले आहेत. भाजपसाठी आता हिंदुत्व काही राहिली नाही, अशी टीका त्यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याबद्दल बोलताना पटोले यांनी म्हटले, "नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रात स्वागत आहे. मोदी जेवढे फिरतील तेवढा काँग्रेसला फायदा आहे. 2014 पासून त्यांनी जे आश्वासन दिले आहे, त्यासंदर्भात आता ते भाषण युट्युबवर व्हायरल होत आहे. दोनशे कोटी जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरकुल बांधण्याचे सांगितले आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती आहे की नाही १४० कोटी जनता भारतीय आहे. मात्र घोषणा करूनही अजूनही असंख्य नागरिकांना घरं मिळाली नाही. महाराष्ट्रात मोदीजी जेवढे फिरतील तेवढा काँग्रेसला फायदा होणार आहे."
तसेच काँग्रेस पक्ष निवडणुकीच्या कामाला लागला असून काँग्रेस पक्षच हा देशाला आणि राज्याला पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. देश विकून देश चालवणाऱ्या भाजपला नागरिकांनी ओळखले आहे. संविधानिक व्यवस्था फक्त काँग्रेसच सांभाळू शकते. राज्यात सध्या दररोज साठ ठिकाणी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपचा असल्याचे दिसत आहे, पोलीस यंत्रणेवर दबाव आहे. राहुल गांधी यांनी नारा दिला आहे 'डरो मत' तीच भूमिका घेऊन आम्ही पुढे जात आहे. महाराष्ट्र हा समता आणि बंधुत्वाचा, शाहू फुले यांचा महाराष्ट्र आहे. राज्यातील पोलीस कोणाच्या दबावात आहेत हा आमचा प्रश्न आहे. सध्या राज्यात भाजपचे सरकार आहे, अकोला, छत्रपती संभाजीनगर, नगर या ठिकाणी पोलीस दबावात होते. यासंदर्भात विधानसभेत प्रश्न विचारू. कोण आहे हा सूत्रधार जो महाराष्ट्रात धार्मिक दंगली घडवत आहे आज ना उद्या तो नागरिकांसमोर येईल, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.