Maharashtra Election 2019: नरेंद्र मोदी फक्त देशाचे नाही तर जगाचे नेते - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 02:19 PM2019-10-10T14:19:53+5:302019-10-10T14:20:33+5:30
माळशिरस विधानसभा निवडणूक २०१९ - निवडणुका जवळ आल्या तरी आमची लढाई कोणाशी हे कळत नाही, समोर कोणी दिसत नाही,
सोलापूर - मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जाण्याचं काम करतंय, मोदींच्या नेतृत्वात अमेरिकेत १ लाख लोकांची सभा झाली. त्या सभेत डोनाल्ड ट्रम्प उपस्थित होते. या पूर्वी अशा कोणत्याही भारतीय नेत्याची सभा अमेरिकेत झाली तरी एक मंत्रीही उपस्थित नसायचे. मोदी फक्त भारताचे नाही तर जगाचे नेते आहेत. त्यांचे वैश्विक नेतृत्व जगाने मान्य केलं आहे. मोदींना बहुमत दिले म्हणून कलम ३७० हटवून देशाला एकसंघ ठेवण्याचं काम सरकारने केलं अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदींचे कौतुक केलं आहे.
सोलापुरातील नातेपुते येथे झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निवडणुका जवळ आल्या तरी आमची लढाई कोणाशी हे कळत नाही, समोर कोणी दिसत नाही, आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत पण समोर लढणारा पैलवान तयार नाही अशी काँग्रेस-राष्ट्रवादीची अवस्था झाली आहे. काँग्रेसचे प्रमुख नेते निवडणूक असताना बँकाँकला फिरायला गेले.शरद पवारांची अवस्था आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बचे तो मेरे पीछे आओ अशी राष्ट्रवादीची अवस्था आहे. या निवडणुकीचा निकाल स्पष्ट आहे. भाजपा-शिवसेना मित्रपक्षाच्या महायुती अभूतपूर्व यशाने निवडून येणार याबाबत शंका नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच राम सातपुतेसारख्या तरुण नेत्याला आम्ही संधी दिली. विद्यार्थी चळवळीतून ते पुढे आले आहेत. २४ तारखेला हा युवा नेता आमदार म्हणून पुढे येणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने आपली हार आधीच मान्य केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात अशी आश्वासन दिली की त्यांना खात्री आम्ही निवडून येणारच नाही. १५ वर्षे महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचं काम काँग्रेस-राष्ट्रवादीने केले. १५ वर्षाचा हिशोब मांडा, या ५ वर्षात आम्ही त्यांच्यापेक्षा दुप्पट काम केलं. या दोन्ही कामाची तुलना केली तर निश्चित ५ वर्षाचं काम सर्वात जास्त होईल. ज्या ज्या वेळी आमचा शेतकरी अडचणीत आला तेव्हा शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहण्याचं काम केलं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, शेतकऱ्याला गेल्या ५ वर्षात ५० हजार कोटी रुपये दिले, गेल्या ५ वर्षात पश्चिम महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्ह्यात प्रलंबित सिंचनाची कामे पूर्ण करण्यासाठी युती सरकारने निधी दिला. जलयुक्त शिवारसाठी योजना केली. सोलापूर जिल्ह्यातील ९२३ गावं दुष्काळमुक्त केली. दिड लाख लोकांना विहीरी दिल्या, ५ लाख लोकांना पंपमुक्त केले. सांगली, सातारा कोल्हापूर येथे पूर आला, मात्र पूराचं पाणी दुष्काळी भागात वळविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. शेतकरी कधी अडचणीत येणार नाही, दुष्काळाचं सामना करावा लागणार नाही. येत्या ५ वर्षात हे स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात काम केले. ३० हजार किमी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत रस्ते तयार केले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.