माझी भूमिका राज्याच्या भल्यासाठीच! अजित पवारांची ‘मन की बात’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 07:47 AM2019-11-25T07:47:47+5:302019-11-25T07:48:26+5:30
‘मी राष्ट्रवादीतच आहे. पक्ष सोडून मी कुठेही गेलेलो नाही. कार्यकर्त्यांनी गैरसमज करून घेण्याची आवश्यकता नाही. मला उभा, आडवा चिरला तरी माझ्या हृदयात शरद पवार दिसून येतील.
सोलापूर: ‘मी राष्ट्रवादीतच आहे. पक्ष सोडून मी कुठेही गेलेलो नाही. कार्यकर्त्यांनी गैरसमज करून घेण्याची आवश्यकता नाही. मला उभा, आडवा चिरला तरी माझ्या हृदयात शरद पवार दिसून येतील. माझी एक राजकीय भूमिका आहे. महाराष्टÑाच्या भल्यासाठी मी ती मांडली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली ‘मन की बात’ मांडली.
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून ‘मौना’त असलेल्या अजित पवारांनी सोलापूर जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांसमोर आपले मन मोकळे केले. राष्टÑवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, संजय हाके-पाटील यांनी रविवारी
सायंकाळी अजित पवार यांची भेट घेतली.
तुमच्या भूमिकेमुळे पवार कुटुंब फुटल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील राष्ट्रवादी कार्यकर्ता संतप्त आहे, असे सांगताच अजितदादांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, केंद्रातील मोदी सरकार चार वर्षे हलणार नाही. महाराष्टÑात तीन आघाड्यांचे सरकार चालू शकत नाही. शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपदाचा सक्षम उमेदवार नाही. केंद्र सरकारचे सहकार्य असल्याशिवाय राज्य सरकार चालविता येत नाही. ग्रामीण भागात भाजपबद्दल नाराजी असली तरी आपण चांगले सरकार चालवू. आपल्याला प्रशासन चालविण्याचा अनुभव आहे. तिघांच्या आघाडीत आपल्याला ते जमणार नाही. म्हणून मी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी राष्ट्रवादीतच आहे. पक्ष सोडून कुठेही गेलेलो नाही. अतिशय विचाराने मी निर्णय घेतला आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. गडबडून जाऊ नका. उद्या सभागृहात भाजप आणि राष्ट्रवादी सरकारचे बहुमत सिद्ध होईल. हे सरकार पुढील चार वर्षे चालेल, असा दावाही त्यांनी केला.
मला साहेब सोडून जात
नाहीत आणि मी पण...
पवार साहेब तुमच्यावर नाराज आहेत, असे उमेश पाटील यांनी सांगितले. त्यावर ‘अरे मी साहेबाला सोडून कुठे जात नाही. साहेबही मला सोडून कुठे जात नाहीत. पवार कुटुंबीय एक आहे. एकच राहणार. तुम्ही चिंता करू नका’, असे उत्तर अजित पवारांनी दिल्याचे पाटील म्हणाले.