सोलापूर : लोकशाहीचा उत्सव म्हणजे मतदान प्रक्रिया, मतदान जागृतीसाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करताना ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांसाठी यांना टपाली मतदान प्रक्रियेत तिरवंडी (ता. माळशिरस ) येथील नारायण नामदेव वाघमोडे यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर तासाभरातच देवाघरी जावे लागले. अखेरच्या क्षणी सर्वात मोठा बजावलेला हक्क लोकशाहीत कायम प्रेरणादायी ठरणार आहे.
२५४ माळशिरस विधानसभा (अ. जा) मतदार संघात ४० टक्के पेक्षा जास्त अपंगत्व असणारे दिव्यांग मतदार व ८५ वर्षापेक्षा अधिक वय असणारे जेष्ठ मतदार अशा एकूण ३३९ मतदारांनी गृह टपाली मतदानाचा पर्याय स्वीकारला होता. २६ ते २८ एप्रिल या कालावधीत १८ पथकांनी या मतदारांच्या घरोघरी जाऊन विहित पद्धतीने मतदान करून घेतले. ३३९ पैकी ८५ वर्षावरील २८९ तर ३० दिव्यांग अशा एकूण ३१९ मतदारांनी मतदान केले. माळशिरस नगरपंचायतचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी सुरेश शेजुळ व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली.
त्या दहा जणांचा हिरावला हक्क...
टपाली मतदानाचा पर्याय स्वीकारणारे १० ज्येष्ठ मतदारांचे मतदानाच्या हक्क बजावण्यापूर्वीच निधन झाले. त्यामुळे दहा व्यक्तींना हक्क नियतीने हिरावला तर तिरवंडी येथील मतदान केंद्र क्रमांक १२८ मधील ज्येष्ठ मतदार नारायण नामदेव वाघमोडे यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अवघ्या एका तासातच त्यांचा मृत्यू झाला.