सोलापूर: आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला मंजूर नाही, पण काँग्रेस मतांसाठी देशात भ्रम निर्माण करीत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात गेल्या दहा वर्षात आम्ही आरक्षणाला धक्का लावला नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पष्ट केले. भाजपचे सोलापुरातील उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी मोदी यांची सोमवारी होम मैदानावर सभा झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
मोदी म्हणाले, काँग्रेसपासून दलित,ओबीसी आणि आदिवासी दूर केले गेले आहेत. त्यामुळे आज मतांसाठी काँग्रेस आम्ही आरक्षण रद्द करणार असल्याचा भ्रम निर्माण करीत आहे काँग्रेस दलित, आदिवासी आणि ओबीसीच्या आरक्षणावर घाला घालून ते अल्पसंख्यांकांना देत आहे, असा आरोप मोदी यांनी केला.
मोदी यांनी भाषणाची सुरुवात मराठीत केली. सोलापुरात पद्मशाली समाज मोठा आहे याचा संदर्भ घेऊन मोदी यांनी सांगितले की अहमदाबादला असताना मी आठवड्यातून एकदा तरी पद्मशाली मित्रांच्या घरी भोजनाला जात असे, म्हणजेच मी पद्मशाली घराचं मीठ खाल्लं आहे. त्यामुळेच मला गरिबांसाठी काम करण्याचे प्रेरणा मिळत आहे.
आमच्या सरकारने सामाजिक न्यायासाठी काम केले आहे, गरीब आईच्या मुलाला मातृभाषेतून वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण घेत यावं, यासाठी उच्च शिक्षणात मातृभाषेचा समावेश करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रारंभी फडणवीस यांचा भाषण झालं ही निवडणूक प्रणिती शिंदेविरुद्ध राम सातपुते नसून मोदींना देशाचे नेतृत्व पुन्हा देण्यासाठी आहे. कारण विरोधक इतका मोठा देश सांभाळू शकत नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे.