सोलापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य व मराठी बांधवांना सीमेवरच गोळ्या घालून मारायला हवे,कर्नाटक सरकारने हे काम केल्यास सरकारच्या पाठीशी राहू असे संतापजनक वक्तव कर्नाटक नवनिर्माण सेनेचा अध्यक्ष भीमाशंकर पाटील याने केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र पडसाद उमटत आहेत. सोमवारी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे आणि शहराध्यक्ष विठ्ठल वानकर यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातील शास्त्री नगर येथील दोन नंबर एसटी डेपोत थांबलेल्या कर्नाटकातील एसटी बसेसच्या कर्नाटकी पाट्या आणि नंबर प्लेटला काळे फासण्यात आले. तसेच बसेसवर जय महाराष्ट्र,बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद, मराठी अस्मिता, युवा सेना, ठाकरे सरकार असा मजकूर रंगवून कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला.
भीमाशंकर पाटलानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनीसुद्धा महाराष्ट्राला एक इंचसुद्धा जागा देणार नाही असे विधान केल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्याच्या निषेधार्थ सोमवारी युवा सेनेकडून शास्त्री नगर बस डेपोत थांबलेल्या कर्नाटकातील दोन बसेसना काळे फासण्यात येऊन समाचार घेण्यात आला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या सोबत आणलेल्या विविध रंगाच्या बाटल्या बसेस रंगवून रिकाम्या केल्या.
यावेळी प्रसाद नीळ,खंडू सलगरकर,शुभम घोलप,संकेत गोटे,अरुण जाधव,इब्राहिम शेख,सोमनाथ जावीर,गुरुनाथ शिंदे,संकेत गाडेकर,विनोद गायकवाड,सचिन शिंदे,प्रथमेश तपासे , ऋषिकेश पवार,तेजस कदम,दीपक हंचाटे,ममू गुंड,तुषार अवताडे,ऋषिकेश राऊत आदी उपस्थित होते.