Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : गेल्या काही दिवसापासून माढा विधानसभा मतदारसंघाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारीसाठी अनेकांनी मागणी केली होती.आता माढा विधानसभा मतदारसंघात मोठी ट्विस्ट पाहायला मिळत आहे. माढा विधानसभा मतदारसंघात खासदार शरद पवार यांनी अभिजीत पाटील यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा एबी फॉर्म दिला आहे.
माढा विधानसभा मतदारसंघात आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनीही उमेदवारीची मागणी केली होती, त्यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू होती. तर आमदार बबनदादा शिंदे यांच्या नावच्याही चर्चा सुरू होत्या. अखेर अभिजीत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत अभिजीत पाटील यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता.
माढ्यात शरद पवारांनी धक्कातंत्र देत यावेळी अभिजीत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत अभिजीत पाटील यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. पण त्यांनी विधानसभेची उमेदवारी शरद पवार गटाकडे मागितली होती.
आमदार बबनराव शिंदे यांनीही काही दिवसापासून उमेदवारीसाठी शरद पवार यांच्याकडे प्रयत्न केले होते. पण त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. आता बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे माढ्यातून अपक्ष निवडणूक लढणार असल्याची घोषणा आमदार बबनराव शिंदे यांनी केली होती.
मोहोळमध्ये रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी
मोहोळमध्ये अजितदादा गटाकडून आमदार यशवंत माने यांनी अर्ज दाखल केला. पवार गटाकडून राजू खरे, संजय क्षीरसागर यांचे नाव चर्चेत होते. 'मी उमेदवार देतो, तुम्ही कामाला लागा...' असे सांगत पवारांनी इच्छुकांनी मतदारसंघात पाठवून दिले होते. त्यामुळे शरद पवार नक्की कोणत्या नावावर शिक्कामोर्तब करतात, याबाबत मतदारसंघात उत्सुकता होती. अखेर पवार यांनी याबाबतचा निर्णय घेत माजी आमदार रमेश कदम यांच्या मुलीला तिकीट देण्याचे निश्चित केले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सिद्धी कदम यांना तिकीट दिल्यानंतर आता पक्षातील इतर इच्छुक नक्की काय भूमिका घेतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.