सोलापूर : येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर सुरू झालेल्या रणजी सामन्यात पहिल्या दिवसाअखेर दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत दिसून आली. पहिल्या डावात सौराष्ट्राचा संघ २०२ धावात गुंडाळला. दुपारनंतर महाराष्ट्र संघाने फलंदाजी सुरू केली मात्र महाराष्ट्राचा अर्धा संघ दिवसाअखेरपर्यंत तंबूत परतला. महाराष्ट्र संघाची धावसंख्या ६ बाद १०४ एवढ्या कायम राहिला.
शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता रणजी सामन्यास सुरूवात झाली. पहिल्या सत्रात सौराष्ट्र संघाची पडखळ सुरुवात झाली. सुरवातीच्या चौथ्या षटकातच हितेश वाळुंज याने सौराष्ट्र संघाला पहिला धक्का दिला. संघाची ११ अशी धावसंख्या असताना केविन जिवराजनी अवघ्या (६) धावांवर पायचीत होऊन तंबूत परतला. त्यापाठोपाठ विश्र्वराज जडेजा याला सुद्या हितेश वाळुंज सहाव्या षटकात शून्य धावांवर परत पाठवले. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजाराने सावध भूमिका घेत डाव सावरण्याचा प्रयत्न केला परंतु दहाव्या षटकात हितेश वाळुंज हा पुन्हा एकदा वरचढ ठरला. त्याने चेतश्वर पुजारा याला पायचीत केले.
जेवणापूर्वी सौराष्ट्र संघाची धावसंख्या ३६ षटकात १०१ वर पाच बाद अशी झाली. जेवणानंतर दुसऱ्या सत्रात धमेंद्र जडेजा व पारेख मंकड यांनी डाव सावरला. दोघांमध्ये सहाव्या विकेट साठी ११८ धावांची शतकीय भागीदारी झाली. पारेख मंकड याने आपले वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले परंतु त्याला फारकाळ विकेट वर थांबता आले नाही. ५६ धावांवर त्याला तरनजितसिंग डील्लन याने पायचीत केले. धर्मेंद्र जडेजा एका बाजूने लढत असताना त्याने आपले वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. 72 धावा केल्यानंतर त्याला हितेश वाळुंज याने कौशल तांबे द्वारे झेलबाद केले. त्यानंतर सौराष्ट्र संघाचा हितेश वाळुंज व तरणजित सिंघ डील्लन या दोघापुढे पूर्ण संघाने गुडघे टेकले. अवघा संघ चहापाण्यापर्यंत २०२ धावांवर गारद झाला. हितेश वाळुंज याने सहा बळी तर तरणजीत डील्लन याने चार बळी घेतले.
दरम्यान, चहापानानंतर महाराष्ट्र संघ फलंदाजीसाठी आला असता सुरुवात निराशाजनक झाली. सहाव्या षटकात ओम भोसले अवघ्या ७ धावावर बाद झाला. त्यानंतर कौशल तांबे व अंकित बावणे यांनी डाव सावरत दुसऱ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. २० व्या षटकात अंकित बावणे वैयक्तीत ३४ धावांवर धावबाद झाला. त्यानंतर कौशल तांबे सुद्धा लगेच माघारी परतल्याने महाराष्ट्र संघ एकापाठोपाठ एक गडी गमावत गेला. केदार जाधव (३) तर , सिद्धार्थ म्हात्रे (११) यांनी धावा केल्या . सौराष्ट्रकडून फिरकी गोलंदाज धर्मेंद्र जडेजा याने ४ बळी आणि युवराज सिंग दोडिया यांनी २ बळी घेतले. दिवसाआखेर महाराष्ट्र संघ २९ षटकात ७ गडी बाद ११६ धावा करू शकला. सौराष्ट्र संघाची महाराष्ट्र संघावर आणखी ८६ धावांची आघाडी आहे. पंच म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे पंच वीरेंद्र शर्मा (हिमाचल प्रदेश) तर रंजिव शर्मा (पंजाब) तर मॅच रेफ्री म्हणून बाळकृष्ण मिष्किन (गोवा) हे काम पाहत आहेत.
सामना पाहण्यासाठी सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीपराव माने, व्हॉईस चेरमन श्रीकांत मोरे , अकलूज वरून अनिल जाधव, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, उपायुक्त भोसले इत्यादी मान्यवर महाराष्ट्र संघाला समर्थन देण्यासाठी उपस्थित होते.