सोलापूर :
येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर (पार्क मैदान) 25 वर्षांखालील वयोगटाच्या कर्नल सी.के. नायडू क्रिकेट ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्राने गोवा संघाचा दहा गडी राखून पराभव करीत दणदणीत विजय मिळविला.
बीसीसीआयच्या माध्यमातून महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या वतीने सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोशिएशनमार्फत आयोजित या स्पर्धेस रविवारी (1 जानेवारी) प्रारंभ झाला होता. गोवा संघाने पहिल्या डावात 275 धावा केल्या होत्या. तर प्रत्युत्तरात महाराष्ट्राने 373 धावा करून 98 धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात गोवा संघ 156 धावांवर सर्वबाद झाला आहे. प्रत्युत्तरात 58 धावांचे माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या महाराष्ट्र संघाने अवघ्या 12.1 षटकात बिनबाद 59 धावा करीत गोवा संघावर दहा गडी राखून मोठा विजय नोंदविला.
गोवा संघाकडून दुसऱ्या डावात आयुष वेर्लेकरने 42, तुनीष सावकारने 34 व आदित्य सूर्यवंशीने 33 धावांची खेळी केली होती. तर महाराष्ट्र संघाकडून सोहन जामळे याने 23 षटकात 66 धावा देत तब्बल 6 विकेट घेत गोवा संघाचे कंबरडे मोडले होते. ए.आर. निशाद याने 3 व ए.एस. ठेंगे याने एक बळी टिपला. दुसऱ्या डावात महाराष्ट्राकडून सलामीवीर डी.एस. फटांगरे याने 21 व आर.व्ही. सोनवने याने 36 धावा केल्या.
तत्पूर्वी, गोवा संघाच्या मंथन खुटकर याने पहिल्या डावात 103 धावांची शतकी खेळी करून सर्वांचे लक्ष वेधले होते. तर महाराष्ट्र संघाकडून पहिल्या डावात दिग्विजय पाटील 81, यश क्षीरसागर 65, अभिषेक पवार 61 व धीरज फटांगरे याने 54 धावांची अर्धशतकी खेळी करून महाराष्ट्राच्या विजयाचा मार्ग सोपा केला होता. महाराष्ट्राच्या सोहन जामळे याही डावात 30.3 षटकात 65 धावा देत 6 विकेट घेतल्या होत्या. दोन्ही डावात मिळून तब्बल 12 विकेट घेत त्याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.