सोलापूर: यंदाच्या वर्षी भागवत एकादशीनंतर महाशिवरात्री आली आहे. या दोनही दिवसांचे मोठे महत्त्व असल्याने या दिवशी उपवास करण्यात येतो. मात्र, एकादशीचा उपवास कधी सोडायचा व महाशिवरात्रीचा उपवास कधी सुरू करायचा, असा प्रश्न भाविकांना पडला आहे.
पंचांगकर्ते मोहन दाते यांनी यावर मार्गदर्शन केले आहे. एकादशीचा उपवास एक दिवस करून दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा असतो. ७ मार्च रोजी एकादशी व ८ मार्च रोजी महाशिवरात्री आहे. त्यामुळे एकादशीचा उपवास ८ मार्च रोजी सकाळी सोडताना भात किंवा अन्नाचा फक्त वास घ्यायचा किंवा देवाचे तीर्थ घेऊन आम्ही उपवास सोडत आहोत, असे म्हणायचे. त्यानंतर महाशिवरात्रीच्या उपवासाला सुरुवात करता येते. दाते म्हणतात...एकाच दिवशी उपवास आणि पारणा (उपवास सोडणे) करताना उपवासास महत्त्व देऊन त्याच दिवशी पारणं करताना भाताच्या घासाचा फक्त वास घ्यावा. अन्न शिजविणारच नसल्यास देवपूजेचे तीर्थ घेऊन मी पारणे करीत आहे, असा संकल्प करावा. नंतर दुसऱ्या व्रताचा उपवास सुरू ठेवावा, म्हणजे उपवासाचे पदार्थ खावेत, असे मोहन दाते यांनी सांगितले. असे पूर्ण करता येईल व्रतएकादशीचा उपवास त्या दिवशी सुरू करून दुसऱ्या दिवशी सकाळी सोडण्यात येतो. ७ मार्च रोजी भागवत एकादशी असून, ८ मार्च रोजी सकाळी एकादशीचा उपवास सोडायचा आहे. मात्र ८ मार्च रोजी महाशिवरात्री आहे. या दिवशीदेखील अनेक लोक उपवास करतात. पहिला उपवास सुरू केल्यानंतर जर तो सोडला नाही तर व्रत पूर्ण होत नाही. पहिला उपवास न सोडता दुसऱ्या दिवशी महाशिवरात्रीचा उपवास केल्यास त्याचे फळ मिळत नाही, असे सांगितले जाते.