२४ मार्च रोजी केंद्र सरकारने कोरोना काळात गर्दी होऊन संसर्ग वाढू नये, यासाठी टाळेबंदी घोषित केली. त्यानंतर राज्य सरकारनेही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा व तालुका प्रशासनाला तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबतचे निर्णय घेण्यास सांगितले. त्यानुसार नगरपालिका व महसूल प्रशासनाने शहरातील दररोज गर्दी होणारे स्थळ म्हणून भाजी मंडई बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. गेले आठ महिने शहरातील घोडे गल्ली येथील भाजी मंडई बंद होती.
शहरातील वेगवेगळ्या भागात भाजीविक्रेत्यांना भाजीविक्री करण्यास तसेच शहराच्या वेगवेगळ्या भागात फिरून भाजी विकण्यास सांगितले होते. या आदेशाची अंमलबजावणी झाली, मात्र शहराच्या हद्दवाढ व विस्तारित भागात भाजीविक्रेते पोहोचत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. मात्र आता शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली महात्मा फुले भाजी मंडई खुली झाल्यामुळे सर्व नागरिकांची सोय झाली आहे. तसेच अनेक भाजीविक्रेते जवळच्या रहदारीचा रस्त्यावरच ठाण मांडून बसत विक्री करीत होते. आता भाजी मंडई सुरू झाल्याने तेही तेथेच बसून विक्री करीत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी होणार आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी मंडई सुरू करावी, अशी मागणी समता परिषदेने केली होती.