मंगळवेढा : सोलापूर - सामाजिक कार्याची आवड मेहनती संघर्ष करणारा नेता म्हणून समाधान आवताडे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. आता दामाजीच्या मागे पांडुरंग उभा असल्याने समाधान आवताडे यांचा विजय निश्चित आहे. गेल्या दिड वर्षात या सरकारचे नाव बदलून महा वसुली आघाडी नाव झाले आहे. जिथे जाऊ तिथे खाऊ अशी या सरकारमधील मंत्र्यांची कामे आहेत असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगाविला.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मंगळवेढा तालुक्यातील बोराळे,नंदेश्वर, डोंगरगाव व मंगळवेढा येथे भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ आले असता ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खा.जयसिध्देश्वर, माढ्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजप नेत्या चित्रा वाघ, आ.प्रशांत परिचारक, माजी सहकारमंत्री आ.सुभाष देशमुख, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ.गोपीचंद पडळकर,आ.सचिन कल्याणशेट्टी, धैर्यशील मोहिते पाटील, माजी मंत्री राम शिंदे, आ.राम सातपुते, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, प्रा.बी.पी.रोंगे, नामदेव जानकर, बालाजी भेगडे, आदीजन उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना आजपर्यंत पाणी देतो म्हणून अनेक भूलथापा देऊन हे निवडून आले होते. पण पाणी काही मिळाले नाही. निवडणूक आली की कोणता तर बनावट कागद दाखवून फसवणूक करून मते मिळवली आहेत. कोरोना काळात राज्यातील नागरिकांना एकाही रुपयांची मदत ठाकरे सरकारने केली नाही. जे मुख्यमंत्री बांधावर जाऊन सांगत होते हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळवून देऊ पण या सरकारने फक्त कवडीमोल मदत केली. सावकारी पध्द्तीने वीज बिलाची शेतकऱ्यांकडून वसुली केली. लॉकडाउनच्या काळात जनतेच्या हाताला काम नव्हते त्यांना दुप्पट बिले देऊन आपली तिजोरी भरली, विजेची थकबाकीच्या नावाखाली यांनी शेतकऱ्यांची वीज कट केली त्यांची ट्रान्स्फर उचलून नेल्याचे पाप यांनी केल्याचेही फडणवीस म्हणाले.
आ.प्रशांत परिचारक म्हणाले की, आजपर्यंत विरोधकांनी येथील जनतेला खोटी आश्वासने देऊन निवडून आले होते. अनेक अपप्रचार करून मते मिळवली. मी आणि समाधान आवताडे आम्ही दोघांनी केवळ मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. ही निवडणूक राज्याची दशा आणि दिशा बदलणारी निवडणूक आहे.