अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष जुगलकिशारे तिवाडी हे होते. यावेळी शिवसेनेचे भाऊसाहेब आंधळकर, माजी झेडपी सदस्य तेजस्विनी मरोड, काँग्रसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब कोरके, राष्ट्रवादीचे वैराग शहराध्यक्ष प्रशांत भालशंकर, राजनसिंह मरोड, काँग्रेसचे कार्याध्यक्ष तानाजी जगदाळे, शहराध्यक्ष अॅड. जीवनदत्त अरगडे, महिला आघाडीच्या निवेदिता आरगडे, युवक काँग्रेसचे निखिल मस्के आदी उपस्थित होते़
प्रास्ताविकात आरगडे यांनी वैराग व बार्शीच्या राजकारणाचा ऊहापोह करीत यापूर्वीच्या नेतृत्वाने वैराग भागाच्या नेतृत्वाला पुढे येऊ देण्यापासून कशाप्रकारे अडथळे आणले याचे विवेचन केले़ भाऊसाहेब आंधळकर यांनी वैराग नगरपंचायत करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रयत्न केल्याचे सांगत यापुढील काळात आपण सर्व मिळून काम करू, असे सांगितले़
निरंजन भूमकर म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे वैराग नगरपंचायत झाली. तसेच आम्ही गेल्या एक वर्षापासून यासाठी पाठपुरावा करीत असल्याचे सांगितले़ जुगलकिशोर तिवाडी यांनी या ठिकाणी उपस्थित असलेल्या नेत्यांच्या पाठपुराव्यामुळेच वैराग नगरपंचायत झाली असल्याचा पुनरुच्चार केला़