मागील काही दिवसापासून पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पदाधिकारी निवडीवरून सुरू असलेले मतभेद, विठ्ठल कारखान्याच्या आर्थिक अडचणीवरून संचालक मंडळ, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेल्या कुरघोडी व पोटनिवडणुकीसंदर्भात कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीतील सर्व पदाधिकाऱ्यांची जाहीर व बंद खोलीत उमेदवारीबाबत मते जाणून घेतली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी आपली मते व्यक्त केली. त्यानुसार मी स्वत: व जयंत पाटील हा अहवाल घेऊन आज रात्री दिल्लीत जात आहोत. याठिकाणची सर्व परिस्थिती राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर मांडणार आहोत. त्यानंतर शरद पवार उमेदवार जाहीर करतील. तो उमेदवार राष्ट्रवादीचा नसून शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी या सर्वच महाविकास आघाडीचा असेल आणि तो कार्यकर्त्यांच्या मनातील असेल, असे सांगत उमेदवाराचे नाव जाहीर करण्याचा सस्पेन्स कायम ठेवला. यावेळी भगीरथ भालके यांच्या समर्थकांमधून त्यांनाच उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली. विरोधी गटाने युवराज पाटील यांच्या नावाचा आग्रह धरला होता. त्यावर अजित पवार भडकले. घोषणा द्याल तर याद राखा, असे म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावले. जयंत पाटीलही भाषणादरम्यान आम्हाला काही कळत नाही का? शरद पवार ठरवतील त्या उमेदवाराला निवडून आणण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आ. संजय शिंदे, पक्ष निरीक्षक सुरेश घुले, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, राजन पाटील, संजय पाटील, उमेश पाटील, दीपक साळुंखे, भगीरथ भालके, युवराज पाटील, दीपक पवार, श्रीकांत शिंदे, संदीप मांडवे, सुधीर भोसले, विजय देशमुख आदींची उपस्थिती होती.
काळे आले नाहीत; मात्र समर्थकांची उपस्थिती
सध्या भाजपमध्ये असले तरी मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या संपर्कात असलेल्या कल्याणराव काळे यांचा आज राष्ट्रवादी प्रवेश असल्याची चर्चा होती. तो प्रत्यक्षात झाला नाही. मात्र, त्यांचे कार्यकर्ते, समर्थक भगीरथ भालके यांची शिफारस करण्यासाठी उपस्थित होते.
कार्यकर्त्यांमध्ये गेटवरच बाचाबाची
पोटनिवडणूक व सध्या दोन गटांतील कार्यकर्त्यांमध्ये असलेला विसंवाद दूर करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री रविवारी पंढरपुरात आले होते. सध्या कोरोनाची साथ सुरू आहे म्हणून हॉलमध्ये मोजक्याच लोकांना सोडण्याचे नियोजन प्रशासनाने केले होते. त्यानुसार कार्यक्रमस्थळी गेटवर पोलीस अधिकारी, संदीप मांडवे, संतोष सुळे, अशी काही मंडळी उपस्थित होती. नंतर राष्ट्रवादीतील एक गट युवराज पाटील, गणेश पाटील, दीपक पवार, सुधीर भोसले व अन्य पदाधिकारी त्याठिकाणी आले. तेव्हा मोजक्या कार्यकर्त्यांना आत सोडण्याचे नियोजन केले आहे. त्याची यादी दीपक साळुंखे यांनी दिल्याचे सांगितले आणि यावरून वादावादी-बाचाबचीला सुरुवात झाली. सर्वांना आत सोडल्याशिवाय आत जाणार नाही, असा पवित्रा घेत या कार्यकर्त्यांनी गेटवर गोंधळ सुरू केला होता. मात्र, आत सोडण्यावरून काही काळ गेटवर एकमेकांना बघून घेण्याची भाषा कार्यकर्ते करू लागल्याने तणाव निर्माण झाला होता.
नाराजांनी मुंबईला यावे, न्याय दिला जाईल
कार्यक्रमस्थळी अजित पवार, जयंत पाटील आल्यानंतर मागे झालेल्या मतभेदाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी आपली मते व्यक्त करावीत, असे सांगितले. तेव्हा सर्वप्रथम सुधीर भोसले, दीपक पवार यांनी आपल्यावर अन्याय होत आहे. आम्हाला आत येण्यास मनाई केली जात आहे. कारखान्याचे या लोकांनी वाटोळे केले आहे. त्यामुळे युवराज पाटलांना उमेदवारी द्या, आशी मागणी केली. पुढे संदीप मांडवे हे त्यांच्यावर झालेला अन्याय सांगत पुढच्या तक्रारीची भाषा करत होते. हे लक्षात येताच अजित पवारांनी माइक हातात घेत हे बोलण्याची ही जागा नाही. नाराजांनी मुंबईला यावे, प्रत्येक कार्यकर्त्याला वेळ दिला जाईल, ऐकून घेतले जाईल, अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे म्हणत हॉलमध्ये सुरू असलेला कार्यक्रम आटोपट बंद खोलीत चर्चा सुरू केली.
फोटो लाइन :::::::::::::::::::::::::::
२१पंड०१
पंढरपूर येथील श्रेयश पॅलेसमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, बळीराम साठे, सुरेश घुले आदी.
२१पंड०२
अजित पवार यांच्याकडे तक्रार देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्यानंतर पोलीस व्हॅनमधून नेताना पोलीस.
२१पंड०३
कार्यक्रमस्थळी आत सोडण्यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटांत काही काळ तणाव निर्माण झाला. त्यावेळी कार्यकर्त्यांचा उडालेला गोंधळ.