२७ ऑक्टोबर आणि २४ जानेवारी रोजी मंत्रालयात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली होती. यावेळी दुष्काळी भाग असलेल्या अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्याला उजनी धरणाचे पाणी देणे गरजेचे आहे. उजनीचे पाणी मिळाले तरच या भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळेल. या योजनेचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. त्यासाठीची चाचणीही पूर्ण केली आहे. आता उर्वरित कालव्यांची कामे पूर्ण करून शेतकऱ्यांच्या शेतात उजनीचे पाणी नेण्यासाठी १०० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. तो निधी अर्थसंकल्पात मंजूर करावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पात ३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, असे म्हेत्रे यांनी सांगितले.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन अक्कलकोट तालुक्यातील रस्ते कामांसाठी निधीची मागणी केली होती, त्यानुसार चव्हाण यांनी तालुक्यातील कंटेहळ्ळी, गळोरगी, उडगी, कल्लप्पावाडी, शिरवळ, सदलापूर, सलगर, तोरणी, मैंदर्गी या गावाना जोडणाऱ्या रस्त्यांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर केल्याचेही म्हेत्रे यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांची सोशल मीडियावर दिवसभर चर्चा
दरम्यान एकरूख योजनेसाठी महाविकास आघाडीने ३५ कोटी रूपयांचा निधी जाहीर केल्याचे कळताच आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शनिवारी सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाल्याचे दिसले. आमदार कल्याणशेट्टी यांच्या कार्यकर्त्यांनी वचनपूर्ती केल्याचे सांगितले, तर म्हेत्रे समर्थकांनी गेल्या १७ वर्षांपासून या योजनेसाठी सिध्दाराम म्हेत्रे यांनी केलेल्या पाठपुराव्याची कागदपत्रे पोस्ट करत महाविकास आघाडीचे आभार मानले.