सोलापूर : काँग्रेस पक्षाविरोधी तसेच सुशीलकुमार शिंदे यांच्याविषयी थेट आरोप करणारे वक्तव्य करीत पक्ष सोडण्याची भाषा करणाऱ्या मनपातील पक्षनेते महेश कोठे यांच्या माध्यमातील वक्तव्यांची गंभीर दखल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने घेतली आहे़ तीन दिवसांत खुलासा करा, अन्यथा आपणाविरुद्ध पक्षशिस्त भंगाची कारवाई केली जाईल, असे नोटिसीमध्ये म्हटले आहे़काँग्रेस पक्षाच्या वतीने आपण सदस्य म्हणून निवडून आलात़ पक्षनेते म्हणूनही आपली नियुक्ती करण्यात आली आहे़ काँग्रेस पक्षाच्या वतीने आपणास विधानसभेची उमेदवारी देखील दिली होती़ काँग्रेसचे नेते या दृष्टीने आपणाकडे पाहण्यात येत असताना आपण प्रसारमाध्यमांकडे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारी प्रतिक्रिया दिली आहे़ याचा विपरित परिणाम काँग्रेस पक्षाच्या प्रतिमेवर होत असून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे आणि या सर्व बाबींमुळे काँग्रेस पक्षाचे नुकसान होण्याची शक्यता आहे असे नोटिसीमध्ये म्हटले आहे़ ही बाब पक्षशिस्तीचा भंग करणारी ठरते त्यामुळे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या आदेशानुसार आपण पक्षशिस्तभंग केल्याबद्दल नोटीस मिळाल्यानंतर तीन दिवसात खुलासा करण्याचे आदेश यातून देण्यात आले आहेत. -------------------मला अद्याप नोटीस मिळाली नाही़ मी पक्षशिस्त सोडून काही बोललो नाही़ कारणे दाखवा नोटीस देण्याइतपत काय घडले ? मी बोलल्यानंतर शहराध्यक्षांनी साधे विचारले देखील नाही, थेट प्रदेशाध्यक्षांची नोटीस कशी काय येते ? मला नोटीस देण्याऐवजी थेट माध्यमांना पाठविले जाते हे पक्षशिस्तभंग नाही काय ?- महेश कोठे, मनपा सभागृह नेते
महेश कोठे यांना प्रदेश काँग्रेसची नोटीस
By admin | Published: July 12, 2014 12:36 AM